समथिंग स्पेशल !

October 10-World Mental Health Day.jpg

१० ऑक्टोबर ! आज ‘जागतिक मानसिक आरोग्यदिन !’ (World Mental Health Day) आतापर्यंत बरेच लेख या संदर्भात लिहिलेले तुम्ही ‘मनसंवाद’ या आपल्या कॉलममध्ये वाचले असणार. म्हणूनच आज ‘समथिंग स्पेशल’ काहीतरी वेगळं या संदर्भात लिहावं असं मला वाटत होतं. आणि मनात वीज चमकावी तसे मला एकदमच क्लिक झाले की, “यस ! अरे ,आपल्या सहवासात असलेल्या आरोग्यपूर्ण व्यक्तीबद्दल का नाही लिहायचं ?”

फ्रेंड्स ! आणि आज योगायोगाने कारणही तसंच स्पेशल आहे ,ते म्हणजे या व्यक्तीचा,अर्थात माझ्या सासूबाईंचा आज वाढदिवस. आज वयाची ७५ वर्षे  पूर्ण केली आहेत त्यांनी.

हो ! माझ्या सासूबाई ! आम्ही त्यांना ‘काकू’ म्हणतो. कारण एकत्र कुटुंबात राहात होत्या.  त्यामुळे मोठी चुलत भावंडं त्यांना काकू म्हणायची .मग मुलेही आणि आता आम्हीही सगळेच त्यांना काकूच म्हणतो. मी आता त्यांचा उल्लेख ‘सासूबाई’ असा करते आहे. अगदी आईच वगैरे नाही;  कारण आई आईच असते. मात्र सासूबाई आईसारख्या असू शकतात. आणि ‘काकू’  तशाच आहेत !

आज सकाळी, सकाळी त्या नेहमीपेक्षा वेगळी साडी नेसून, तयार होऊन फ्रेश पूजा करायला आल्या. आणि खरंच त्यांना बघून इतकं फ्रेश आणि प्रसन्न वाटलं म्हणून सांगू ! ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ? असा मला प्रश्न पडला.

बरेच जणांना असा विचार मनात येईल की, माझा हा उगीचच ‘इम्प’  मारण्याचा किंवा मक्खन लावण्याचा प्रकार आहे. पण म्हणूनच सांगते , आमचे नेहमी सासू-सुनेचे उडतात तसे खटके उडतात. कारण आम्ही सामान्य आणि नॉर्मल आहोत, असं मी म्हणेन. फक्त वैशिष्ट्य हे की, नंतर पुढच्या क्षणाला आम्ही गळ्यात गळे घालतो. एकमेकींचे सगळेच गुण आम्हाला दिसतात व ते appreciate ही  करतो. मला वाटतं हे मानसिक आरोग्य टिकवण्याचं  महत्त्वाचं लक्षण आहे. Let Go ! करतोय म्हणूनच आनंदी असतो.

अर्थात याचं श्रेय जास्तीत जास्त त्यांना जाते; कारण त्या तथाकथित ‘सासू’  आहेत. तरीही कुठलाही आकस मनात न धरता त्या परत बोलायला येतात. आजपर्यंत कधीही मी त्यांना बोलावलं आणि त्या आल्या नाहीत, असं झालेलं नाही. पटकन उठून येतात, थकत कशा नाहीत ? याचे उत्तर त्यांच्याकडे नीट बघितले  की लक्षात येते.

सदैव कुणालाही मदतीला तयार असणाऱ्या आणि सतत दुसऱ्याचा विचार करण्याचा स्वभाव असणाऱ्या काकू म्हणजे “चिंता करतो विश्वाची या पठडीतल्या !” सगळ्या दुनियेची दुःख त्यांना आपली वाटतात .समोरची कोणीही व्यक्ती असो , त्याच्याकडे फक्त ‘एक माणूस’  म्हणून बघण्याची त्यांची निर्लेप वृत्ती. मग कोणाला बरे नाही म्हणून त्याला एखादा व्यायामप्रकार सांगतील ,नाही तर कुणाचे लग्न ठरत नाही म्हणून एखादे स्तोत्र स्वतः वाचतील. स्वयंपाकवाल्या मावशीचे पाय दुखत असतील तर तिला सायटिकाचे एक्युप्रेशर पॉइंट्स देतील (हो ! त्यांचं वाचन आणि नॉलेज दांडगं आहे). घरातल्या काम करणाऱ्यांचा विचार त्या इतक्या करतात की, कधी तरी आम्हीच बाजूला पडतो . म्हणजे मी कधीतरी कामवाली बाई नीट काम करत नाही म्हणून कुरकुर केली तर त्या सांगतात की, “अगं ती सांगत होती ,की आज्जी म्हणे सकाळची निघाली दुपारपर्यंत भूक लागून जाते तिला !”

सतत अगदी किती दिवसांत याला फोन नाही केला , त्याची खुशाली नाही कळली असा आठवून आठवून फोन करतात. अगदी लहान-थोर सगळ्यांशी संपर्क ठेवलाय त्यांनी. सगळ्यांशी नातेसंबंध जपले गेले आहेत ते काकूंमुळे ! आणि म्हणूनच मागे एका लेखात मी संदर्भ दिला होता की, डॉक्टर सोम्या हेगडे या बंगलोरच्या मनोविकारतज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे अगदी फॅमिलीबरोबर राहूनही व्यक्ती एकटी  किंवा एकाकी होऊ शकते.

एकाकीपणाच्या भावनेचे मूळ हे तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही आणि तुमच्याकडे प्रेम करण्यासाठी कोणी नाही हे आहे. प्रेम देत आणि हेच जाणे हा एकाकीपणा वरचा उपाय आहे. काकूंच्या बाबतीत त्यांना कधीही एकटं न वाटण्याचं कारण हेच असावं असं मला वाटतं !

मुख्य म्हणजे हे सगळं त्या घरात बसून करतात. आमचे बाबा म्हणजे सासरे आता चालू शकत नाहीत. त्यांची पूर्ण काळजी त्या घेतात .तेही अगदी वेळच्यावेळी, ठरल्याप्रमाणे! दोघे मिळून टीव्ही पाहतात .त्यातील मालिकांच्या कथानकांवर दोघंही  काकू-बाबा चक्क घरातल्या मेम्बर्ससारखी चर्चा करतात त्यावेळी खूप मजा येते ! मी घरात येऊन ३० वर्षे  झाली; पण आजपर्यंत कुणाची कागाळी, उणंदुणं काढणं, टीका करणं फारसं कधी ऐकलं नाही.

त्यांनाही अस्थमाचा, संधिवाताचा त्रास आहे; पण कुरकुर नाही, सतत दुखणं सांगणं तर नाहीच नाही. त्यामुळे बाहेर पडता येत नाही, घरात बसून कंटाळा आला आहे ही तक्रार दोघांचीही नाही. एक-दोन वेळा मोठी आजारपणे येऊन गेली पण त्यातून बाहेर पडण्याचे कारण म्हणजे त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदी स्वभाव !

सतत स्वतःला कार्यरत ठेवल्यामुळे अजूनही हालचाली खूप मोकळ्या आहेत. भांडी लावताना ओट्यावर टोपले ठेवून लावत नाहीत, खाली ठेवून लावतात. कारण काय तर खाली वाकणे झाले  पाहिजे म्हणजे शरीर मोकळे राहते. (मी नेमके उलट करते !)

देवाची साग्रसंगीत पूजा, पोथी, स्त्रोत्र म्हणणे, जप यात अलीकडे त्यांचं मन खूप रमायला लागलं  आहे. आणि हीच परमेश्वराप्रती असलेली श्रद्धा त्यांना नेहमी सकारात्मक ठेवते, चिंता ,भीती, नैराश्य यापासून दूर ठेवते.

भजनी मंडळ वगैरेची त्यांना फारशी आवड नाही. सगळे करतात म्हणून आपण करावं अशी टेंडन्सी तर नाहीच नाही. स्वतः संगीत विशारद सुवर्णपदक विजेत्या आहेत. त्या काळातील ग्रॅज्युएट आहेत. काही दिवस नोकरी केली. पण लग्न झाल्यावर बाबांनी कुटुंबासाठी खेड्यात प्रॅक्टिस सुरू केली. एकत्र कुटुंब ,त्यातील कामं, खेड्यातले जीवन हे सगळं विनातक्रार स्वीकारलं !

आयुष्य जसं येईल तसं स्वीकारल्यामुळे मला वाटतं आनंदी स्वभाव आणि मानसिक आरोग्य कायम राहिलं.

पूर्वी आमच्या घरीच संगीत नाटक बसवत असत, त्याचे काही प्रयोग तेव्हा केले . काही गाण्याचे कार्यक्रमही केले. परंतु अतिमहत्त्वाकांक्षी स्वभाव नाही. समाधानी वृत्ती हीच त्यांच्या आरोग्याची प्रसन्नतेची किल्ली आहे. म्हणूनच अजूनही आंघोळ करताना, चहा करताना त्या छान गाणं गुणगुणत असतात.

शारीरिक आरोग्य संरक्षण कसं करायचं तेही त्यांच्याकडूनच शिकावं. अजूनही आठवड्यातून दोनदा न्हाणे झालेच पाहिजे ,काहीही खाल्ल्या- प्यायल्यावर दात घासलेच पाहिजे. हा त्यांचा नियम आहे. जे जे नवीन वाचतील त्याचा प्रयोग त्या करतात. जास्वंदीची फुलं ,कापूर आणि असंच काय काय! अजूनही पूर्ण काळेभोर व लांब केस हेच त्याचं फळ ! (त्यांच्या आईप्रमाणे आनुवंशिक देणगीदेखील ) प्राणायाम ,बसून व्यायाम आणि मुख्य म्हणजे चौरस आहार–त्यामध्ये एकही दिवस कुचराई, जाऊ दे ना एखादी दिवशी चालतं ! वगैरेची माझ्यासारखी चालढकल नाही. जेवणाच्या वेळा कधीच चुकत नाहीत. हे रुटीन पाळणं, या सगळ्या शिस्तबद्ध सवयी ह्या आरोग्यपूर्णतेकडे नेतात. आमच्या पिढीचा आळस ,दुर्लक्ष ,चालढकल निश्चितपणे आमच्या तब्येतीवर परिणाम करतात. अखंड उत्साहाचा झरा असलेल्या काकूंचा हे सगळं  करण्यामागे उद्देश पण आपला भार कुणावर पडू नये हाच आहे. तसेच स्वतः फिट असू तर लोकांसाठी काही करू शकू हा विचार, खरंच विचारात घेण्यासारखा आहे.

बरेच दिवसांपासून सुडोकू सोडवणे ,शब्दकोडे सोडवणे सुरू केले . हो! विस्मरणासारखं काही नको व्हायला ! तरी चष्मा, मोबाईल हरवतो आजकाल कुठे कुठे ! (पण तो तर माझाही हरवयला  लागलाय म्हणा !) वाचन भरपूर आहे , लेखनही आहे. पाठकोरे कागद घेऊन काहीबाही बारीक बारीक अक्षरात ‘नोट्स काढणं’  सुरू असतं! कशाचे तरी भाषांतर करायला डिक्शनरी घेऊन बसलेल्या असतात.

त्या आणि त्यांच्या चौघी बहिणी, यांचे फोन्स आणि एकूण सगळे बघितले की मला शांता शेळके यांच्या ‘चौघीजणी’ या पुस्तकातील बहिणींची आठवण येते.

आता हातात व्हाट्सअप आले. सध्या त्याचा लळा लागला आहे. ते शिकून घेणे सुरू आहे. मग शुभा, प्रभाला हे कळव ,तर माधुरीला ते! दिवसभर सुरू असते.

त्यात आता नातही मोठी झाली आहे आणि नातसूनही आली आहे. त्यामुळे आता त्यांना माहिती देणे, सूचना देणे चालते. त्यामुळे आमची आता थोडी सुटका झाली आहे.आताची पोरं हुशार आहेत. हो आजी ! म्हणून एकूण घेतात . आणि करायचं ते करतात. पण त्यामुळे ‘आजीच्या मायेचे मोल’ कमी नाही होत .

खरंच त्यांच्यामुळे आज घरात आनंद आहे , घराला घरपण आहे. एक श्रद्धास्थान आहे ते असंच कायम लाभो हीच प्रार्थना !

फ्रेंड्स ! आपल्या आजूबाजूला किंवा घरातील अशी वडील मंडळी आपल्याला दिसतात. बरेचदा काही गोष्टी उगीचच त्रासदायक वाटतात त्यांच्या ! पण करा ना त्या नजरेआड ! कारण त्यापलीकडे त्यांच्या रूपाने काय संपत्ती आहे आपल्याकडे, हे नाही कळणार !

उलट कुठल्याही खेळाप्रमाणे ह्यांच्या पिढीने आपल्या हातात सोपवलेली मशाल, जर आपण तेवत ठेवून आयुष्याच्या मार्गावर धावलो आणि पुढच्या पिढीकडे ही मशाल सोपवली तर मानसिक आरोग्यदिन वेगळा साजरा करण्याची गरज हळूहळू पडणार नाही याची मला खात्री आहे .

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER