नागपुरात मतमोजणी दरम्यान काँग्रेसकडून अनेक आक्षेप

Congress

नागपूर : नागपूर व रामटेकच्या मतमोजणीला सुरुवात होताच काँग्रेसकडून ईव्हीएम बदलण्यात आल्याची तक्रार करीत मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला. यानंतर मतमोजणीची प्रक्रिया पार पडेपर्यंत काँग्रेसकडून आक्षेपांचा भडीमार सुरूच होता. रामटेकचे काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी तब्बल ५० वर आक्षेप घेतले. तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी थेट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मतमोजणीत तफावत असल्याची तक्रार केली.

ही बातमी पण वाचा : आता विधानसभा लढवा, नंतरच राजकारणातून संन्यास घ्या ; गडकरींचा पटोलेंना टोला

मतमोजणीच्या प्रक्रियेत प्रत्यक्षात मोजणीच्या वेळी असलेल्या ईव्हीएम मशीनच्या क्रमांकात तफावत होती. उत्तर, दक्षिण व मध्य नागपूर विधानसभेतही असाच प्रकार लक्षात आला. काँग्रेसच्या प्रतिनिधींनी यावर आक्षेप घेतला. तीन ईव्हीएम मशीनच्या क्रमांकात घोळ असल्याचे त्यांनी सांगितले. मध्य नागपूरच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व काँग्रेसच्या उमेदवारांचे प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे प्रकरण नेले.

ही बातमी पण वाचा : राजकारण विसरून आता विकास करण्याची गरज : नितीन गडकरी

दुसरीकडे रामटेक लोकसभा मतदार संघातही काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी आक्षेपांचा भडीमार केला. मतमोजणीला सुरुवात होताच काही ईव्हीएम मशीनचे सील व्यवस्थित नाही. मशीन सुरू होत नाही, अशाप्रकारच्या अनेक तक्रारींचा भडीमार गजभिये यांनी केला. मतमोजणी संपेपर्यंत त्यांचे आक्षेप सुरूच होते. तर निवडणूक आयोगाची वेबसाईट आणि फेरीतील मतदान यात अंतर असल्याबाबतची तक्रार पटोले यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे मतदान केंद्रावरच केली. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचेही ते म्हणाले. मात्र याउपरांत मतमोजणी प्रक्रिया सुरु राहिली.

ही बातमी पण वाचा : आगामी सरकारने अर्थव्यवस्था दुरुस्त करण्यास प्राथमिकता द्यावी!