भारतीय तरुणाईचा लठ्ठपणा कमी होणार!

NIn

Ajit Gogateहैदराबाद येथील ‘राष्ट्रीय पोषण संस्थे’ने (National Institute of Nutrtion) तयार केलेला  पोषक आहार आणि भारतीयांचे आरोग्य या संबंधीचा ताजा अहवाल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी नवी दिल्लीत प्रसिद्ध केला. हा अहवाल खूप महत्वाचा आहे. पण त्यास माध्यमांमध्ये म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. थट्टेने सांगायचे तर हा अहवाल भारतामधील  तरुणाईमधील स्थूल (Over-weight)  व लठ्ठ (Obecce) व्यक्तींची संख्या रातोरात कमी करणारा आहे! प्रत्यक्षात लठ्ठ व्यक्तींचे वजन एका ग्रॅमनेही कमी झाले नसले तरी आपला लठ्ठपणा बराच कमी झाल्याचे आभासी समाधान अनेकांना या अहवालामुळे कदाचित मिळू शकेल. Þथट्टा बाजूला ठेवून आता जरा या अहवालाच्या महत्वाविषयी पाहू.

डॉक्टर एखाद्या व्यक्तीस तुमचे वजन खूप वाढले आहे, असे कशाच्या आधारे सांगतात? यासाठी ‘बॉडी मस इंडेक्स’(Body Mass Index) चे सूत्र वापरले जाते. ठराविक वयोगटातील व्यक्तीचे ‘आदर्श’ वजन किती असायला हवे हे ‘बीएमआय’वरून ठरविले जाते. वय व उंचीनुसार आदर्श वजनाचे गुणोत्तर म्हणजे ‘बीएमआय’ असे म्हणता येईल. ‘बीएमआय’चा हा आकडा पुरुष व स्त्री यांच्यासाठी भिन्न असतो. हे ‘बीएमआय’चे आकडे वयोगट व उंचीनुसार तक्त्याच्या स्वरूपात दिलेले असतात. अनुवंशिकता, आहार व हवामान यात फरक असल्याने ‘बीएमआय’ देशागणिक ही भिन्न असतो. तुमचे वजन या ‘बीएमआय’हून किती जास्त आहे यावरून  तुम्ही प्रकृतीने  स्थूल आहात, लठ्ठ आहात की अतिलठ्ठ आहात  हे ठरविले जाते.

पण ‘बीएमआय’ ठरविण्यासाठी विविध वयोगटातील  ‘आदर्श पुरुष’ व ‘आदर्श स्त्रीचे’ वजन व उंची किती गृहित धरायची, हे माहित असायला हवे. विविध बाबींचा विचार करून हे सरासरी ‘आदर्श’ वजन व उंची ठरविण्याचे एक शास्त्र आहे.अशा प्रकारे ‘आदर्श’ वजन व उंची एकदा निश्चित करून भागत नाही. त्यात बदलत्या परिस्थितीनुसार व काळानुरूप वेळोवेळी सुधारणा करत राहावे लागते. प्रत्येक देशात हे ‘आदर्श’ वजन व ‘आदर्श’ उंची निरनिराळी ठरविली जाते. किंबहूना म्हणूनच त्यांचे ‘बीएमआय’ निरनिराळे असतात. त्यामुळे भारतात स्थूल किंवा लठ्ठ म्हटली जाणारी व्यक्ती अमेरिकेत तशी ठरविली जाईलच असे नाही.

‘एनआयएन’ ही केंद्र सरकारची ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’च्या अखत्यारित काम करणारी १०० वर्षांची जुनी अग्रगण्य संशोधन संस्था आहे. भारतासाठीचा ‘बीएमआय’ ज्यावरून निश्चित केला जातो त्याचा आधार असलेले ‘आदर्श’ वजन व आदर्श’ उंची ठरविण्याची जबाबदारी ‘एनआयएन’वर आहे. संस्थेने याचाच  एक भाग म्हणून ताज्या अहवालात इतर बाबींखेरीज विविध वयोगटातील भारतीयांसाठी सुधारित ‘आदर्श’ वजन व उंची नक्की केली. सन १९८९ व २०१०च्या अहवालानुसार  १९ ते ४० वयोगटातील भारतीय पुरुषाचे सरासरी आदर्श वजन ६० किलो व उंची ५ फूट सहा इंच ठरविली गेली होती. त्यात आता ६५ किलो व ५ किलो आठ इंच अशी सुधारणा करण्यात आली आहे.

तसेच महिलांच्या बाबतीत  ५० किलोवरून ५५ किलो व ५ फूटांवरून ५ फूच ३ इंच अशी सुधारणा केली गेली. यासाठी  केलेले सर्वेक्षण फक्त शहरी भागांत व तेही सुखवस्तू कुटुंबांत केले गेले होते. आता ग्रामीम भागातील जनताही सर्वेक्षणात घेण्यात आली. आधीची आकडेवारी नमुन्यासाठी फक्त १० राज्यांमधून घेण्यात आली होती. आता तिची व्यापाती देशव्यापी आहे. आताचे आदर्श वजन ठरविताना ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-४ (२०१५-१६), ‘नॅशनल न्युट्रिशन मॉनिटरिंग ब्युरो’ (२०१५-१६), जागतिक आरोग्य संघटना (२००६-०७) आणि ‘इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ पीडियाट्रिक्स’ (२०१५) यांच्या आधीच्या अहवालांचाही यासाठी आधार घेण्यात आला. आता यथावकाश या अहवालानुसार या वयोगटासाठीचा ‘बीएमआय’ बदलला जाईल. साहजिकच निकषच बदलल्याने लठ्ठ, स्थूल व अतिस्थूल म्हटल्या जाणार्‍या  व्यक्तिंच्या संख्येतही बदल होईल.

आहाराच्या बाबतीत पाश्चात्यांचे अंधानुकरण, शरीराला कमीत कमी कष्ट होतील अशा आरामदायी जीवनशैलीकडे वाढता कल, बैठे व बिनकष्टाचे काम आणि नियमित व्यायामाचा अभाव यासह इतरही अनेक कारणांमुळे भारतीयांमध्ये वाढत असलेला लठ्ठपणा ही एक चिंतेची बाब आहे. खास करून तरुणांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. पूर्वी ग्रामीण लोकांमध्ये क्वचित आढळणारा लठ्ठपणा आता तेथेही आढळू लागला आहे. वाढता लठ्ठपणा ही एक जागतिक समस्या तर आहेच. पण त्यातही याचे प्रमाण भारतात सर्वाधिक वेगाने वाढत आहे.

गेल्या २० वर्षात देशाने वेगाने केलेली आर्थिक प्रगती व त्यामुळे मोठ्या समाजवर्गात झिरपत गेलेली सुबत्ता याच्याशीही याचा संबंध आहे. एका वैज्ञानिक अभ्यास पाहणीनुसार  २० ते ६९ वयागटातील भारतीयांमधील स्थूलतेचे प्रमाण सन २०४० पर्यंत दुप्पटीहून अधिक तर लठ्ठतेचे प्रमाण कदाचित तिप्पट होईल, असा अंदाज आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक आहे. वृद्धावस्थेतही हे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. लठ्ठ आणि अतिलठ्ठ व्यक्ती मधूमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकार अशा साथीच्या नसलेल्या आजारांना इतरांहून लवकर बळी पडतात.

आरोग्याच्या सततच्या तक्रारींमुळे त्यांची उत्पादकताही कमी होते. त्यामुळे पोषणमूल्यांच्या दृष्टीने आदर्श आहार कसा व किती असावा तसेच सरासरी भारतीयांमध्ये तो किती व कसा आहे याचाही तौलनिक अभ्यास ‘एनआयएन’ने या ताज्या अहवालात केला आहे. सरकारला धोरणे व कार्यक्रम ठरविताना संस्थेचे हे काम खूप मोलाचे ठरते.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER