मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात आम्ही सहकार्य करू , संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द

obc-leaders-meet-mp-chhatrapati-sambhaji-raje

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वातावरण चांगलेच पेटले आहे . यापार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली याचा मला आनंद झाला आहे. मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, असा शब्द ओबीसी समाजातील नेत्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना दिला.

मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष वाढू नये यासाठी माजी खासदार हरीभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतली. या भेटीनंतर संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला .

छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेतले. शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिले. माझी पहिल्या दिवशी पासून हीच भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर समाजाला विश्वासात घेऊन सोडवला जावा अशी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. आज ओबीसी समाजाचे नेते माझ्याकडे भेटायला आले होते. त्यांनी मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचा शब्द दिला. ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जी भूमिका घेतली त्याचा मला आनंद आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

ओबीसी आणि मराठा समाजातील लोकांनी एकत्र येत यावर मार्ग कसा काढता येईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावा. तसेच सकल मराठा समाजाच्या लोकांसोबत मी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण यांना भेटणार आहे. त्यावेळी ओबीसी समाजातील लोकांना सोबत घेऊन मार्ग काढण्याबाबत मार्ग सुचवणार आहे, असेही संभाजीराजेंनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER