ओबामा, गोंधळलेले नेते आणि गोवारीकर

Barack Obama - Rahul Gandhi - Dr. Vasant Gowarikar Editorial

Shailendra Paranjapeभारतातला पाऊस किंवा मान्सून अंदाज वर्तवायला गुंतागुंतीचा. महाराष्ट्रातून नवी दिल्लीत पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होण्यापर्यंत प्रगती केलेले डॉ. वसंत गोवारीकर (Dr. Vasant Gowarikar) यांनी मान्सून मॉडेल देशाला दिलं. भारतात चार महिन्यांत होणाऱ्या मोसमी पावसाचा अंदाज वर्तवणारं गणिती प्रतिमान त्यांनी विकसित केलं. ज्येष्ठ हवामान संशोधक डॉ. व्ही. थपलियाल यांचं त्यात महत्त्वाचं योगदान होतं.

एकूण १६ निकषांचा विचार करून त्यात वेळोवेळी होणारे बदल टिपून गोवारीकर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटानं जवळपास दशकभर भारतीय पावसाचं केवळ शुभवर्तमान अचूकतेनं दिलं. त्यामुळे या प्रतिमानाला गोवारीकर मान्सून मॉडेल असंही संबोधलं जाऊ लागलं.

त्या काळात भारताची लोकसंख्या १०० कोटींवर पोहचेल, अशा उंबरठ्यावर होती आणि अनेक तज्ज्ञ भारताच्या विकासात मोठी लोकसंख्या हा अडथळा आहे, असं मत मांडायचे. त्या वेळी निवृत्तीनंतर गोवारीकर यांनी या विषयात संशोधन करून भारताची लोकसंख्या ही विकासाला अडथळा ठरणार नसून तेच आपले बलस्थान बनू शकेल, अशी मांडणी केली होती.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी कॉंग्रेस (Congress) उपाध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा केलेला ‘गोंधळलेले नेते’ हा उल्लेख. ओबामा यांनी त्यांच्या `अ प्रॉमिस लॅण्ड’ या नव्या पुस्तकात हा उल्लेख केल्याचं वृत्त अमेरिकी आणि भारतीय वृत्तपत्रांतूनही प्रसिद्ध झालंय. या वृत्तानुसार ओबामा यांनी राहुल गांधी एखाद्या घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे असून शिक्षकांना प्रभावित करण्यासाठी उत्सुक पण फारशी चमक नसलेले आणि विषयात प्रावीण्य मिळवण्याची गुणवत्ताही नसलेले विद्यार्थी आहेत, असं लिहिलंय.

ओबामा भारत भेटीवर आले असताना डिसेंबर २०१७ मध्ये राहुल गांधी यांना भेटले होते. त्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी ओबामा यांच्याबरोबर फलदायी चर्चा झाल्याचं ट्विटरवरून लिहिलं होतं. विशेष म्हणजे ओबामा यांना पुन्हा भेटायला आवडेल, असंही गांधी यांनी ट्विटमध्ये नमूद केलं होतं. ओबामा यांनीच गांधी यांना रिडिक्यूल केल्यानं आता ती फलदायी चर्चा म्हणजे नेमकं काय होतं, हेही गांधी यांनी सांगायला हवं.

भारतीय मान्सूनच्या संदर्भात पाश्चात्त्य देशांकडून केले जाणारे एल निनो किंवा ला निनो या हवामानशास्त्रीय संभाव्य घटकांचे अंदाज, याबद्दल वसंत गोवारीकर कायम चिकित्सकपणे विश्लेषण करत. भारताची अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असल्यानं एल निनो किंवा ला निनोमुळं भारतीय मान्सूनच्या प्रगतीवर कसा विपरी त परिणाम होणार आहे, या बातम्या पाश्चात्त्य माध्यमांमधून आल्या की संपूर्ण देशभर चिंतेचं वातावरण पसरत असे. पण गोवारीकर त्याचं विश्लेषण करून हे अंदाज पाश्चात्त्य देश राजकीय, आर्थिक डावपेचांचा भाग म्हणून कसे वापरतात, हे सोदाहरण स्पष्ट करत असत.

त्याच पद्धतीनं ओबामा यांनी राहुल गांधी, मनमोहन सिंग (Manmohan Singh) किंवा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासंदर्भात सकारात्मक किंवा नकारात्मक टिप्पणी केली तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यामुळे भारतात अंधार होण्याची किंवा दिवाळी साजरी करण्याची गरज नाही, हे लक्षात घ्यायला हवं. भारतातल्या नेत्यांना ओबामा किंवा ट्रम्प किंवा अगदी बायडेन यांच्याही प्रमाणपत्राची गरज नाही.

जगभरचे लोक मतं व्यक्त करतील, त्यांचा विचार करायला हवा. प्रसंगी त्यातून काही बोधही घ्यायला हरकत नाही वा त्याकडे दुर्लक्षही करायला हरकत नाही; पण ओबामा बोलल्यानं भारतात उलथापालथ किंवा अंधार किंवा दिवाळी केल्यास आपण आत्मनिर्भरतेपासून दूरच आहोत, असंच सिद्ध केल्यासारखं होईल.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER