मुख्यमंत्री ठाकरेंच्या शपविधीला पावणे तीन कोटी, तर फडणवीसांच्या शपथविधीला ९८ लाखांचा खर्च

CM Uddhav Thcakeray-Devendra Fadnavis

मुंबई :- विधानसभा निवडणुकीत भाजपाशिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही शिवसेनेने भाजपाला दूर करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर या आघाडीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा सहा कॅबिनेट मंत्र्यांना यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली होती.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री ठाकरे प्रथमच बारामतीत, पवारांच्या गोविंद बागेत खास प्रीतीभोजनाचं आयोजन

या शपथविधी सोहळ्याचा भव्य सेट कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारला होता. उध्दव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्या सोहळ्याचा खर्च दोन कोटी ७९ लाखांवर गेल्याचे दिसून येत आहे. दादर येथे पुष्पसजावट तीन लाख रुपये, तर दादरच्या शिवाजी पार्कवरील विद्युतीकरणाच्या कामाचा खर्च तब्बल दोन कोटी ७६ लाख इतका झाल्याचे दिसून येत आहे. तुलनेने उध्दव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी फडणवीस सरकारपेक्षा दीड कोटींहून अधिक खर्च जास्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उस्मानाबादमधील निखील चनभट्टी या माहिती अधिकार कार्यकर्त्याने यासंदर्भात माहिती अधिकारातून माहिती मागितली होती. त्यानंतर हा तपशील उघड झाला आहे.

दरम्यान, २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांचा वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधी पार पडला होता. त्यावेळी वानखेडे स्टेडियमच्या विद्युत रोषणाई वरती ३० लाख ६० हजार ६७० रुपये, शामियाना सजवण्यासाठी ६७ लाख ६७० रुपये खर्च आला होता. फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठी एकूण ९८ लाख ३७ हजार ९५० रुपये खर्च झाल्याचे उघड झाले आहे.