जायफळ – सुगंधी व उपयोगी मसाला द्रव्य

श्रीखंड पुरणपोळीला जायफळचा सुगंध आल्याशिवाय मजा नाही. तांबूलात असो वा बासुंदीमधे थोडे जायफळ घातले की सुगंध, चव आणि औषधीगुण सर्वच मिळतात. भारत मसाल्यांच्या बाबतीत किती समुद्ध आहे हे आपल्या लक्षात येते. गोड पदार्थां करीता पाचक सुगंधी मसाले उदा. जायफळ (Nutmeg) वेलची दालचिनी आपल्याकडे आहेत जे चव आणतात आणि गोड पदार्थाचे पाचनही करतात. तिखट पदार्थांकरीता मिरे धणे जीरे इ. अनेक मसाले आपल्याकडे आहेत. यांचा उपयोग स्वयंपाकात आपण करतो. त्यामुळे आर्टिफिशियल इसेन्सची गरजच आपल्याला पडत नाही. आपण ते जाणले पाहिजे व जपले पाहिजे हे मात्र नक्की. जायफळ हे त्यापैकी एक.

जातिफल, मालतीफल, मज्जासार, कुसुमफल अशा विविध नावांनी ओळखले जाणारे हे जायफळ. जायफळाच्या झाडाला येणारे फळ पिकून फुटल्यावर त्यातील बिया उन्हात वाळवितात. या बियांमधून हलण्याचा आवाज यायला लागला की फोडून बियांचे आवरण दूर करतात व आतील जायफळ बाजारात विकतात. बियांचे कवच देखील वाळवून जायपत्री म्हणून वापरली जाते.

  • Health Benefits of Nutmeg | Glorious Jaiphal ke Faydeजायफळ सूज कमी करणारे वेदना शांत करणारे आहे. म्हणूनच डोके दुखत असेल तर जायफळ उगाळून त्याचा लेप कपाळाला लावल्यास आराम पडतो आणि शांत झोप लागते.
  • अति शोक किंवा थकव्यामुळे कपाळ दुखत असेल तसेच झोप लागत नसेल तर कपाळावर आणि पायांच्या तळव्यांना हा लेप लावावा.
  • चेहर्‍यावर काळे डाग, ब्लॅक हेड, तारुण्य पिटीका असतील तर दुधात उगाळून जायफलाचा लेप लावतात त्यामुळे चेहरा उजळतो डाग नाहीसे होतात. तसेच मुखदूषिका ( पिंपल्स) दूर होतात.
  • बाळगुटी मधील एक मुख्य द्रव्य जायफळ आहे. लहान बाळांना जायफळ उगाळून दिल्यास शांत झोप लागते. अतिसार, दुर्गंधी पातळ संडास होत असेल तर जायफळ उगाळून नाभीभोवती लेप लावावा. थोडे थोडे आईच्या दूधातून चाटण द्यावे.
  • लहान बाळांना सर्दी पडसे झाले असेल तर जायफळ मोहरीच्या तेलात उगाळून त्याचा लेप कपाळावर व गळा छातीवर लावल्यास कफ कमी होतो.
  • जायफळ उत्तम मुखदुर्गंधीनाशक रुचि वाढविणारे तसेच यकृताचे कार्य चांगले करणारे आहे. भूक न लागणे मुखदुर्गंधी असणे तसेच जंत झाले असल्यास जायफळ घेणे फायदेशीर ठरते. विड्याच्या पानात थोडेसे जायफळ घालणे हितावह ठरते.
  • शांत झोप लागत नसल्यास जायफळ उगाळून कपाळावर लेप लावावा. म्हशीच्या दुधात जायफळ पूड टाकून ते दूध प्यावे.
  • अतिसार चिकट आव पडणे पोटाला मुरडा येणे यासारख्या विकारामधे जायफळ पूड ताकासह उपयोगी ठरते.
  • जायफळ वृष्य शक्ती वाढविणारे, कामोत्तेजक, शुक्रस्खलन लवकर न करणारे असल्याने दूधात जायफळ घालून देतात.
  • जायफळ मादक आहे त्यामुळे अति मात्रेत घेतल्यास चक्कर येणे, बडबडणे, मुर्च्छा अशी लक्षणे निर्माण होऊ शकतात.

जायपत्री सुद्धा जायफळाप्रमाणे विशेष गुणकारी असते. असे हे सुगंधी जायफळ प्रत्येक घरात असणारे, सणवाराला गोडाधोड पदार्थात हमखास वापरण्यात येणारे.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER