आता रात्री ८ वाजताही जाता येईल मंत्रालयात

Mantralaya

मुंबई :- मंत्रालयात काही विभागांतील कर्मचारी, अधिकारी हे रात्री उशिरापर्यंत काम करतात पण बहुतांश कर्मचारी सायंकाळी सहासव्वासहानंतर मंत्रालय सोडतात. मात्र आता रात्री ८ पर्यंत मंत्रालयातील विविध विभाग सुरू राहतील. जलसंधारण विभागाने त्याची सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी संवाद साधताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, सामाजिक अंतर राखण्यासाठी शासकीय कार्यालयांमधील कामाच्या वेळा बदलाव्यात असे सुचविले होते. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने कार्यालयीन कामकाजाच्या वेळांबाबत एक धोरण निश्चित करावे व ते देशातील शासकीय कार्यालयांसाठी लागू करावे अशी महत्त्वाची सूचना त्यांनी केली होती. ठाकरे यांच्या सांगण्यावरून केंद्र सरकारने असे कोणतेही धोरण आणले नाही.

आता राज्यातील आणि विशेषत: मंत्रालयातील विभागांच्या वेळा बदलण्याचे काम सुरू झाले आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व विभागांना एक पत्र पाठवून कामाच्या वेळांचे नियोजन करा आणि दोन शिफ्टमध्ये कामे सुरू करा असे निर्देश दिले. त्यानुसार आता प्रत्येक विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.

कामाच्या वेळा बदलल्याने केवळ मंत्रालयातीलच गर्दी कमी होईल असे नाही तर कर्मचारी, अधिकाऱ्यांची जाण्यायेण्याची एकचवेळ राहणार नसल्याने बसेस व लोकल रेल्वेगाड्यातील गर्दी कमी होण्यासदेखील मदत होणार आहे. जलसंधारण विभागात १५ मार्चपासून निम्मे कर्मचाºयांना सकाळी ८ ते सायंकाळी ४ आणि निम्मे कर्मचाऱ्यांना दुपारी १२ ते रात्री ८ अशा दोन शिफ्टमध्ये कामावर बोलविण्यात आले आहे. सकाळी ८ च्या शिफ्टमधील एखादा कर्मचारी, अधिकारी समजा एक तास उशिराने कामावर आला तर त्याला सायंकाळी ४ ऐवजी सायंकाळी ५ पर्यंत काम करून वेळ भरून द्यावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेची अंमलबजावणी करणारा जलसंधारण हा पहिला विभाग ठरला आहे.

मंत्रालयातील कामे रात्री ८ पर्यंत सुरू राहणार असल्याने राज्याच्या विविध भागांतून कामांसाठी मंत्रालया येणाऱ्या लोकांनाही रात्री ८ पर्यंत मंत्रालयात जाण्याची मुभा असेल का हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. या बाबत सामान्य प्रशासन विभाग येत्या एकदोन दिवसात आदेश काढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER