आता विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत काय होणार?

Now what will happen in the Assembly Speaker election

विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले नाना पटोले (Nana Patole)यांची २४ तास उलटत नाहीत तोच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली पण आता त्यांच्या जागी कोण अध्यक्ष होणार आणि ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार का याची जोरदार राजकीय चर्चा आता सुरू झाली आहे.

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसलाच मिळण्याची अपेक्षा असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी गुगली टाकला आहे. अध्यक्षपदाचे काय करायचे याचा निर्णय एकत्रितपणे बसून करावा लागेल असे पवार यांनी म्हटले आहे. हे अध्यक्षपद कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसलाच दिले जाईल असे पवार यांनी बिनदिक्कतपणे सांगितले असते तर आता असलेली चर्चाच सुरू झाली नसती पण पवार यांनी काँग्रेसला गॅसवर ठेवले आहे.

महाविकास आघाडी सरकारकडे निर्भेळ बहुमत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार उभा केला आणि आघाडी एकसंध राहिली तर भाजपचा पराभव ही काळ्या दगडावरची रेष असेल. दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी आम्ही कोणतीही शिडी न वापरता फासे पलटवू शकतो असे व्निधान शुक्रवारी केले. या विधानाचा संबंध विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी जोडला जात आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होईल. या निवडणुकीच्या आड ‘आॅपरेशन कमळ’ केले जाईल का या बाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. ‘फङणवीस यांनी गेल्या वर्षभरात खूप फासे टाकून पाहिले पण आमचे सरकार मजबूत आहे. त्यांचे फासे पार गुळगुळीत झाले’ असा टोला शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत (Sanjay Raut)यांनी हाणला आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच राऊत शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत आणि मुखपत्रातील शनिवारच्या अग्रलेखात महाविकास आघाडीत काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद हे पाच वर्षांसाठी देण्यात आले होते; एक वर्षातच राजीनामा देण्यासाठी नाही असा चिमटा काढला आहे. तसेच, काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचा अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल, असे सूचकपणे म्हटले आहे. अध्यक्षपदाची संधी पुन्हा काँग्रेसलाच दिली तर काही दगाफटका महाविकास आघाडीतच होईल का अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

अर्थात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आॅपरेशन कमळ करणे वाटते तेवढे सोपे नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष जोमदारपणे एकत्र आहेत. परस्पर समन्वयातून सत्ता चालविली जात आहे. पूर्वी १५ वर्षे आघाडी सरकार होते तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत वारंवार कुरघोड्या केल्या जात असत. त्याच्या एक दशांश टक्केही कुरघोड्या आज केल्या जात नाहीत. तरीही एखादी फट दिसते का याचा प्रयत्न भाजप नक्कीच करू शकतो. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झालेल्या नाना पटोलेंचा राजकीय प्रवास कसा होता?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER