आता कोरोना ‘स्पाईक’वरही मात करायला हवी

Corona Spike

Shailendra Paranjapeपावसाळा सुरू झाला की सारी सृष्टीच बदलून जाते. सगळीकडे हिरवंगार वातावरण होतं. मनं प्रसन्न होतात. वास्तविक, पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या मोसमी पावसाच्या वेळापत्रकात एकूण ३५ दिवस पाऊस पडण्याचे असतात आणि या मोजक्या दिवसांत पाऊस अख्ख्या वर्षभराचं शेती, अर्थव्यवस्थेचं स्वरूप हिरवंगार करून जातो. यंदाच्या पावसाच्या अंदाजात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये भरपूर पर्जन्यवृष्टी होणार आहे, असं सांगण्यात आलंय. त्यामुळं अनलॉकपर्वाचा एक महिना पूर्ण होत आला असून जूनअखेरपर्यंत अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्या वाढलीय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन पुन्हा केलं जाणार नाही, असं स्पष्ट केलंय. त्यामुळं जुलै महिन्यात आणखी काळजी घेण्याची गरज आहे.

ही काळजी घ्यावी लागणार आहे त्याचं साधं कारण असं आहे की, जुलैमध्ये  पाऊस खूप होणार आहे. त्याबरोबरच कोरोना संसर्गदेखील वाढलेला असणार आहे. कोरोना संसर्गाचा पीक किंवा स्पाइक हा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात असेल, असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळं जुलैमध्ये  पाऊस बरसत असताना संशयित, रुग्ण आणि तत्काळ उपचारांची आयसीयूची किंवा व्हेंटिलेटर्सची गरज भासेल, अशा रुग्णांच्या ने-आणीवर तसंच रुग्ण कोविड समर्पित रुग्णालयांकडे, केंद्रांकडे नेताना तारांबळ होऊ शकते.

पाऊस जुलैमध्ये  बरसणार आहे आणि तेव्हाच वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिका, छोट्या वाहनांची सोय मोठ्या प्रमाणावर करावी लागेल. त्याबरोबरच पुण्याच्या म्हणजे शहराच्या हद्दीलगत १३ही तालुक्यांमध्ये तालुकापातळीवरचं कोविड उपचार केंद्र सुरू करायला हवीत. पुण्यामध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यास पुणं शहराची वाढ लक्षात घेता, त्या त्या हद्दीलगतचे रुग्ण शहराच्या मध्यवर्ती किंवा मोठ्या रुग्णालयांकडे न आणता विकेंद्रित पद्धतीनं तालुकास्तरावर किंवा शहराच्या सीमेवर असलेल्या नवले रुग्णालय, औंध रुग्णालय, विप्रो रुग्णालय अशा ठिकाणी पाठवता येतील; पण त्या रुग्णालयांनाही अतिरिक्त खाटांची सोय करायला हवी. तसंच तेथे आयसीयू, व्हेंटिलेटर्स जास्ती पुरवण्याची गरज आहे.

पुण्याचं नाव कोरोनाच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नकाशावर गेलेलं असताना पुण्याच्या ग्रामीण भागानं मात्र तुलनेनं चांगली कामगिरी बजावल्याचं लक्षात येतंय. लॉकडाऊन उठताना मे महिन्यात दोन-तीन दिवसांत मुंबई-पुण्यातून पुण्याच्या ग्रामीण भागात स्थलांतर मोठ्या प्रमाणावर झालं आणि त्यातून पुणे ग्रामीणमधले रुग्ण वाढले. पण तरीही युद्धपातळीवर उपाययोजना करून पुणे ग्रामीणमधे केवळ ३३ रुग्णांचा मृत्यू ओढवलेला आहे.

पुणे शहरात मार्चच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर पुढे रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ झालीय. सुरुवातीला केवळ पुण्याच्या पूर्व भागात असलेला कोरोना आता सर्वच भागांत दिसून आलाय. विशेष म्हणजे पूर्व भागात कोरोना आटोक्यात आणण्यात यश येतंय तसंच बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होतेय. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५८ टक्क्यांपेक्षा जास्ती आहे आणि जुलै महिन्यात मुसळधार पाऊस होऊन गेल्यानंतर रुग्णसंख्येत कितपत वाढ होते, हे लक्षात घेऊन संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः पिण्याचं पाणी उकळून पिणं, बाहेरून आल्यावर हात साबणानं व्यवस्थित धुणं, विनाकारण गावात फिरत न बसता आवश्यक तेव्हाच बाहेर पडणं आणि बाहेर जाण्याची गरज असेलच तर नवनवे अड्डे वगैरे शोधण्याची किंवा कुठे वडा-पाव मिळतोय, याची सोशल मीडियावरून आलेली माहिती तपासून तेथे जाण्याची ही वेळ नाही. कोरोना संपल्यानंतर हवे तितके वडापाव खाता येतील, हे लक्षात घेण्याची गरज आहे.

आपल्या देशानं प्रगत देशांच्या तुलनेतही कोरोना आटोक्यात ठेवण्यात खूप चांगली कामगिरी केलीय. त्यामुळं लस विकसित होण्याच्या उंबरठ्यावर सारं जग येत असताना केवळ आपल्या बेजबाबदार उतावळ्या वागण्यानं देशाचं नाव खराब होणार नाही, याची काळजी आपल्यापैकी प्रत्येकानं घेण्याची गरज आहे. विशेषतः जुलैचा पहिला पंधरवडा सावधानता बाळगायलाच हवी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER