आता उद्धव ठाकरेंनी नाणार आंदोलनकांवरचेही गुन्हे मागे घेतले

मुंबई : आरे कारशेडला विरोध करणा-या आंदोलनकांवर दाखल करण्यात आलेलेल गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेतल्यानंतर त्यांनी आता नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हेसुद्धा मागे घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

कोकणात हा प्रकल्प होऊ नये यासाठी शिवसेनेनेही आंदोलनात उडी घेतली होती. त्यामुळे या प्रकरणात दाखल झालेले गुन्हे आता मागे घेण्यात येणार असल्याने कोकणातल्या आंदोलकांना दिलासा मिळाला आहे. आंदोलनानंतर हा प्रकल्प रायगडला हलविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते असं वाटल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता.

त्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्याची अटच लोकसभा निवडणुकीत युती करताना शिवसेनेनं भाजपला घातली होती. त्यामुळे कोकणातला हा प्रकल्प बारगळला होता. निवडणुकीच्या काळात त्यावरून राजकारणही तापलं होतं. आता सरकार बदलल्याने या प्रकल्पाविषयी या सरकारची काय भूमिका राहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खटले मागे घेतल्याने गढ असलेल्या कोकणात शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे.