दलित-वंचितांना पुढे नेण्यासाठी आता विधानसभाही स्वबळावर लढू – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

सोलापूर : सध्याचे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकार असो की अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार, या सर्वांनीच बहुजन समाजातील मोठ्या घटकाला कायम वंचित ठेवण्याचे काम केले. सामाजिक अन् आर्थिकदृष्ट्या त्यांना पुढे येऊच दिले नाही. आता बहुजनांमधील हा घटक मोठ्या प्रमाणात जागरूक झाला आहे. सामाजिक वंचितांची आणि स्वतःला वंचित समजणाऱ्यांची ही लढाई आता लोकांची लढाई झाली आहे. त्यामुळे वंचित बहुजनांची दखल ही घ्यावीच लागणार आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

ही बातमी पण वाचा : माढा काय अन् बारामती काय, आम्ही सातारासुद्धा जिंकणारच – मुख्यमंत्री फडणवीस

भाजप सरकार असो की अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार या सर्वांनीच बहुजन समाजातील मोठ्या घटकाला कायम वंचित ठेवण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची ही लढाई आहे. वंचित बहुजन हा देशातील ४० टक्के मतदार आहे. तो काही भागांत एकवटला असेल हे मला मान्य आहे; पण जो वंचितांमधील समूह आहे, तो प्रत्येक सभेनंतर आमच्याशी जे बोलत होता, वचनबद्धता सांगत होता, त्यामुळे आम्ही पुढे जात आहोत. त्यामुळे दलित-वंचितांच्या न्यायासाठी आता आगामी विधानसभा निवडणुकाही आम्ही स्वबळावर लढू. अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

प्रकाश आंबेडकर यांनी सकाळला दिलेली विशेष मुलाखत…

प्रश्न: वंचित बहुजन आघाडी खरंच बहुजनांतील वंचितांचा विकास साधू शकेल?

प्रकाश आंबेडकर: सोशल इंजिनीअरिंगचा हा पहिलाच प्रयोग नाही. यापूर्वीही भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून वंचित घटकांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. त्याला काही फळं आली. आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्याला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. या माध्यमातून आम्ही बहुजनांच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. वंचितांमधील मोठा समूह हा कायम आर्थिकदृष्ट्या मागास ठेवण्यात आला. त्यांना बँकिंगच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले. कारण त्याच्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही नव्हते. अशा घटकांच्या विकासाचे कार्यक्रम आम्ही देऊ.  आता तर या घटकांच्या विकासाचे प्रयत्न सुरू केल्याशिवाय कोणात्याही सरकारपुढे पर्यायच राहणार नाही. वंचितांची दखल घ्यावीच लागेल.

ही बातमी पण वाचा : मला पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांना मोठा धक्का देणार! – प्रकाश आंबेडकर

प्रश्न: निवडणुकीसाठीची आर्थिक ताकद कशी उभी करता?

प्रकाश आंबेडकर: अर्थात लोकांकडूनच. आपण थोडं डोळसपणे बघितलं तर असे दिसेल की, बहुजन समाजाला कायम दाबण्याचा प्रयत्न झाला. मात्र, १९९० ते १९९५ या काळातील राजकीय दबावामुळे अपरिहार्यतेतून काही सकारात्मक पावले उचलावी लागली. परिणामी बहुजन समाजातील काही घटक आर्थिकदृष्ट्या थोडा सावरला. पूर्वी आर्थिक ताकद नसल्याने गप्प राहावे लागत होते. आता ती वेळ नाही. यंदाच्या निवडणुकीपुरता विचार केला तरी वंचित बहुजनांमधून निवडणूक लढविण्यासाठी आर्थिक किंवा प्रत्यक्ष सहभागाच्या रूपाने मदत होऊ लागली आहे. चंद्रपूरच्या मेळाव्यात तर सर्वसाधारण घरातील दोन महिलांनी त्यांची मंगळसूत्रे आम्हाला दिली. आम्ही या महिलांच्या भावनांचा आदर ठेवला. दोन्हीही मंगळसूत्रे सांभाळून ठेवली आहेत. निवडणुकीनंतर आम्ही त्यांना ती परत करू. या महिला अतिशय साधारण घरातील आहेत. त्यांच्याकडे थोडी शेती आहे. काही वेळा दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करून त्यांचे कुटुंब चालते. ही घटना मोठी आहे. बहुजन समाजातील महिलेने प्रचारासाठी मंगळसूत्र काढून देणे ही आमच्यासाठी तरी क्रांतिकारी घटना आहे. अशा पद्धतीने हे काम चालते. आता आम्हाला प्रश्न विचारला जातोय की, पैसा कुठून उभा राहतो? यामागील गर्भितार्थ असा आहे की, आम्ही तुम्हाला गरीब ठेवलं होतं. आम्ही बघितलं की, तुम्ही गरीबच राहा. पण आता तुमच्याकडे ‘रिसोर्स’ आला कुठून? हा प्रश्न केला जात आहे. बहुजनांकडे ‘रिसोर्स’ आला कोठून हे या लोकांना बघत नाही, म्हणून असे प्रश्न विचारले जातात.

प्रश्न: काँग्रेस-राष्ट्रवादी हे संघाचे हस्तक आहेत, असा आरोप आपण केला आहे?

प्रकाश आंबेडकर : आमचं जागांसाठी बेसिकली भांडण नाही. भांडण आहे ते मुळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेअंतर्गत आणण्याचं आहे. माझा आरोप आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादीचं भाजपसोबत साटंलोटं आहे. येथे मुस्लिम, ख्रिश्चन, शेड्युल कास्ट आणि आदिवासी हा आपण नाही म्हटला तरी देशाचा ४० टक्के मतदार आहे. हा मतदार ‘आरएसएस’कडून त्रस्त आहे. आणि ‘आरएसएस’कडून त्रस्त असल्यामुळे आम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात तरी सहभागी करून घ्या. उलट पक्षात नसताना बाहेरून आयात करून यांनी सनातन्यांच्या हस्तकांना उमेदवारी दिली. आम्हाला मात्र, दूर ठेवलं. आम्ही जिंकणाऱ्या जागा मागितल्याच नव्हत्या. गेल्या ७० वर्षांत माळी, धनगर लोकसभेत गेला नाही. त्यांना उमेदवारी द्या, ओबीसीतील लहान घटकांना, मुस्लिमांना द्या. कुठल्या जागा मागितल्या होत्या तर जेथे काँग्रेस सातत्याने हरत आली आहे.

ही बातमी पण वाचा  : माझी खरी लढत वंचित बहुजन आघाडीशी! – सुशीलकुमार शिंदे

त्या जागा द्या. आम्ही जिंकलेल्या जागा मागितल्याच नव्हत्या. जेथे उमेदवार नाहीत त्या द्या, अशी मागणी करण्यात आली होती. पण त्यांनी नाकारल्याने आम्हाला ४८ जागा लढणे अपरिहार्य ठरलं. आज असं दिसतेय की, या सर्व जागांवर आमचीच लढाई भाजप-शिवसेनेबरोबर आहे.

प्रश्न: ‘एमआयएम’ला आपल्या घटक पक्षांकडून विरोध होतो आहे का?

प्रकाश आंबेडकर: काही घटकांना चिंता आहे, हे मी मानतो; परंतु यापूर्वीही मी जे प्रयोग केले त्यावेळीही मला मनोमन पाठिंबा देणारे घटक कधी सोबत आले, कधी नाही. त्यामुळे सध्या लगेच चिंतेचे कारण नाही. डाव्या पक्षांनी मला पाठिंबा दिला त्याचे मी स्वागत करतो. परंतु हा बदल त्यांनी यापूर्वीच केला असता तर आज जे दिसते त्यात स्पष्टता आली असती. ज्या एनसीपीसोबत ते जा म्हणतात त्या एनसीपीला अटलबिहारी वाजपेयींच्या काळात राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीचे अध्यक्षपद दिले होते. त्यांना सत्ता जवळ हवी आहे.

प्रश्न: वंचित आघाडीच्या राजकारणामुळे रिपब्लिकन चळवळ मागे पडली असे वाटते का?

प्रकाश आंबेडकर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा मूकनायक सुरू केले, नंतर बहिष्कृत सुरू केले, नंतर जनता अन् नंतर प्रबुद्ध भारत हे नियतकालिक सुरू केले. प्रत्येक फेजेसचे एरर संपल्यानंतर ते तेथे अडकून राहिले नाहीत. ते पुढे पुढे गेले. नावामध्ये त्यांनी चळवळ कधीच अडकविली नाही. तर त्यांनी नावाच्या माध्यमातून माझी चळवळ काय हे ते लोकांना सांगत गेले. आम्हीसुद्धा हेच करीत आहोत. बहुजनांची चळवळ झाली. त्यानंतर आता वंचितांची चळवळ आहे. वंचितांचे आम्ही ब्रीद वाक्य केले आहे की, आम्ही वंचित आहोत. यापुढे कुणाला वंचित राहू देणार नाही. जेव्हा आम्ही एक्स्लुसिव्ह राजकारण करीत नाही आहोत तर इन्क्लूसिव्ह राजकारण करीत आहोत. यात परंपरात असणारा सत्ताधारी वर्ग हा आमचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोधक आहे. आजपर्यंत त्यांनी याच परंपरेच्या नावाखाली आपली सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही असे मानतो की, या परंपरागत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी सत्ता  त्या वर्गापुरती मर्यादित केली नाही तर त्यांच्या कुटुंबापुरती मर्यादित केली. त्यामुळे एक परंपरागत वर्चस्व मानणारा वर्ग हासुद्धा कुटुंबशाहीमुळे वंचित राहिला. हा वर्ग ओपनली आमच्याकडे येणार नाही; मात्र आतून तो आमचा राहील. कालांतराने हा वर्ग वंचितांसोबत येण्याची शक्यता आहे, असे मी या ठिकाणी मानतो.

प्रश्न : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी पुन्हा बोलणार का?

प्रकाश आंबेडकर: आम्ही विधानसभेलाही स्वतंत्रपणे लढणार आहोत. आता ते दरवाजे आम्ही बंद केले. आम्ही सर्वांना घेऊन पुढे जाण्याच्या विचारात होतो. परंतु, वर्चस्वाची मानसिकता जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आली आहे आणि ती कुटुंबशाहीतून आली आहे. ती आता अशा स्तराला गेली आहे की, काय वक्तव्य करतो याचेही त्यांना भान राहिलेले नाही. साधं उदाहरण देतो. आम्ही एखादवेळी हेलिकॉप्टर वापरले तर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकांची अशी मानसिकता आहे की, अरे! यांनी हेलिकॉप्टर का वापरले? पूर्वी कमी हेलिकॉप्टर होती, ती महागडी होती. आता अनेक कंपन्या आल्याने हेलिकॉप्टर स्वस्तात मिळतात. ही जी क्षुद्र मानसिकता आहे, या क्षुद्र मानसिकतेबरोबर जावे असे आम्हाला आता वाटत नाही.

प्रश्न: वंचित आघाडीचा प्रयोग इतर राज्यांत नेणार का?

प्रकाश आंबेडकर: आता यशाची खात्री म्हणण्यापेक्षा मी मतदारांचे मत मांडेन. माळी, धनगर आणि वंजारी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे वंचित बहुजन घटक आहेत. आज विचार केला तर वंजारी हे भाजपकडे आहेत. धनगर हा घटक बऱ्यापैकी आमच्याकडे आहे. माळ्यांचा जो प्रश्न आहे तो फेजेसमध्ये आहे. ३० ते ४० टक्के आमच्याकडे आहे. तो ६० टक्क्यांपर्यंत आमच्याकडे येईल. स्मॉलर ओबीसी सोनार, लोहार हा समाज आज ८० टक्क्यांपर्यंत आमच्याकडे आहे. सध्या आमच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत; पण आमचे उमेदवार रेसमध्ये आहेत. आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे मुस्लिम. मुस्लिम समाजाचे आजचे मत हे भाजपला जो कुणी पराभूत  करेल  त्यांच्याकडे जाणारे आहेत. आता मुस्लिम आमच्याकडे झुकू लागला आहे. एमआयएमचे तालुक्यातील सेंटर हे आमचे या समाजात शिरण्याचे केंद्र आहे. उद्या, मुस्लिमांनी थेट आमच्याकडे आल्यास अनेक मतदारसंघांमधील रिझल्ट हे आमच्या बाजूने लागतील. चार जागा आम्हाला मिळाल्या तरी देशातील ही दुसऱ्या क्रमांकाची क्रांती ठरेल. हे एक मोठे सोशल ट्रान्स्फॉर्मेशन ठरेल आणि या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रक्रियेला कुणी थांबवू शकणार नाही. आम्ही जर जिंकलो तर राजकारणातील पैशाचा रोल पराभूत होईल. लोकशाही ही धनदांडग्यांची नाही, जातदांडग्यांची नाही, धर्मदांडग्यांची नाही, घराणेशाहीची नाही तर खऱ्या अर्थाने लोकांची असेल. आम्हाला अपेक्षित यश मिळाल्यास भाजप, काँग्रेसलाही आपल्या धोरणांत बदल करावे लागतील. सामाजिक क्रांतीची सुरुवात होईल. त्याचा परिणाम वंचितांकडेही आर्थिक ताकद निर्माण होऊ शकेल.

दरम्यान, राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्‍के आरक्षण दिले; परंतु ओबीसी समाजाला त्यांच्या २७ टक्‍के आरक्षणाची चिंता लागली आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षण वेगवेगळे करून त्याचे लाभ निश्‍चित करण्याची गरज असल्याचे मत  आंबेडकर यांनी व्यक्‍त केले. संविधान बदलण्याची भाषा भाजप नेते करीत असतानाही कॉंग्रेस त्यावर काहीच बोलत नाही. भाजपचा मुस्लिमांना अगोदरपासूनच विरोध आहे; परंतु आता कॉंग्रेसही मुस्लिमांवर दबाव टाकत आहे; मात्र आपण त्यांना भयमुक्‍त करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबशाही व राजेशाही संपुष्टात आणण्याच्या उद्देशानेच वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या मैदानात आहे. कॉंग्रेसबरोबर आमची स्पर्धा नाही, तर भाजपच्या उमेदवारांविरुद्ध लढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील मतदान प्रक्रियेचा डाटा लिक होऊ शकतो, मग ईव्हीएम का हॅक होऊ शकत नाही? कोणत्याही इलेक्‍ट्रॉनिक यंत्रात छेडछाड शक्‍य आहे; परंतु कॉंग्रेस सत्तेवर असताना त्यांनी कधीही बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, असा विचार केला नाही. आता मात्र ईव्हीएम नको, अशी मागणी केली जात आहे, असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.