आता पंतप्रधानांनी खरे बोलायला हवे – शिवसेना

PM Narendra Modi - Xi Jinping

मुंबई : पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. सरोवराच्या दक्षिण काठाजवळ २९ ते ३० ऑगस्टदरम्यान घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने सोमवारी पुन्हा चिथावणीखोर लष्करी कारवाया केल्या. दोन्ही देशांच्या लष्करी कमांडरदरम्यान बुधवारी चर्चेची आणखी एक फेरी होऊनही तणाव कायम आहे. आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेनं (Shiv Sena) आजच्या सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) लक्ष्य केले आहे. हिंदुस्थानचा ‘मीडिया’ लडाखवरील तणावाच्या, चकमकीच्या एकतर्फी चुकीच्या बातम्या देत आहे. आपले सैनिक सीमेवर बेधडक उभेच आहेत. चिन्यांशी ते लढतील व जिंकतील, पण सरकारतर्फे याबाबत पसरवल्या जाणाऱ्या एकतर्फी बातम्यांच्या मोहजालात आपला मीडिया गुंग होऊन धुंद झाला असेल तर ते जबाबदारीने वागत नाहीत हे सत्य आहे. हिंदुस्थानी सैन्याच्या हल्ल्यात चिनी सैनिक रोज मारले जात आहेत व सीमेवर सर्वत्र आलबेल शांतता आहे हे तितकेसे खरे वाटत नाही. परराष्ट्रमंत्री जयशंकर हे ‘ट्विटर’वर जे सांगत आहेत त्यापेक्षा वेगळी स्थिती सीमेवर असावी, पण खरे बोलायचे कोणी, हा प्रश्नच आहे! असे शिवसेनेने म्हटले आहे.

आज सामनातील अग्रलेख…

चीनच्या (China) सीमेवर मोठाच धूमधडाका सुरू आहे. पूर्व लडाखच्या (Ladakh) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने घुसखोरी केलीच आहे. चीन मागे हटायला तयार नाही. आता असे वृत्त आले आहे की, पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न हिंदुस्थानी जवानांनी हाणून पाडला. हे आपल्या जवानांचे शौर्य आहे. चीनचे लष्कर लडाख सीमेवर सतत आगळीक करत आहे. चीन धोकेबाज आहे. चीनवर विश्वास ठेवता येत नाही. सीमेवरील तणाव निवळावा यासाठी दोन देशांतील लष्करी अधिकाऱ्यांत चर्चा सुरू आहे. चर्चेचा निकाल लागलेला नाही. तरीही चीनवाले सीमेवर जो तांडवी उद्योग करीत आहेत, तोच चीनचा मूळ स्वभाव आहे व तो जाणार नाही. 29 ऑगस्टच्या रात्री साधारण दोन वाजता 200 चिनी सैनिकांनी रणगाडे व इतर शस्रसाठ्यासह चुशूल जनरल क्षेत्रात घुसखोरी केली. चिनी सैनिकांची ही घुसखोरी म्हणजे रात्रीच्या अंधारात केलेला हल्लाच होता, पण आपल्या सैनिकांनीही बंदुका ताणून चिन्यांना रोखले अशी माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर यांनी ट्विटर माध्यमातून दिली आहे. पण चिन्यांचा कांगावा असा की, जयशंकर जे सांगत आहेत तसे काही घडलेच नाही. चिनी सैनिकांनी कोणत्याही प्रकारची घुसखोरी केलेली नाही व दोन देशांत याबाबत चर्चा सुरू असल्याचे चीनकडून स्पष्ट करण्यात आले. अर्थात चीनने कितीही आपटली तरी आपण जयशंकर यांच्यावरच विश्वास ठेवायला हवा.

सीमेवरील तणाव तसेच चीनची घुसखोरी व हिंदुस्थानी सैन्याचा प्रतिकार याबाबत परराष्ट्रमंत्री देशाला माहिती देत आहेत इतका चिंतेचा विषय आहे. यावर एकतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेसमोर येऊन खरे काय ते सांगायला हवे. निदानपक्षी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बोलायला हवे. 5 मे रोजी दोन्ही देशांच्या सैन्य तुकडय़ांत पँगाँग सरोवर भागात हिंसक चकमकी झाल्या. दोन देशांच्या सैन्यांत अशा चकमकी होतात त्यात वीसेक जवानांचे प्राण जातात व शंभरावर जखमी होतात तेव्हा त्याला ‘चकमक’ म्हणत नाहीत, तर युद्धच म्हणायला हवे. पाकिस्तानच्या बाजूने कश्मीर खोऱयात अशी चकमक, घुसखोरी केली जाते तेव्हा त्यास छुपे युद्ध असेच म्हटले जाते व पाकिस्तानला कसे चोख उत्तर दिले याच्या तोफांचे शब्दबार उडवले जातात. चीनच्या बाबतीत वेगळा न्याय दिसत आहे. 5 मेच्या हिंसक चकमकीत हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले व पँगाँग सरोवर परिसरात घुसलेल्या चिनी सैन्याने अद्यापि माघार घेतलेली नाही, पेचप्रसंग संपलेला नाही व जयशंकर यांच्या मते लडाख सीमेवरील स्थिती 1961-62पेक्षा भयंकर आहे. हे मत जयशंकर यांचे व्यक्तिगत असूच शकत नाही.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे मत काय आहे, त्यांनी हिंदुस्थानी सैन्याची काय व्यूहरचना केली आहे ते आता महत्त्वाचे आहे. राजनाथ सिंह आता रशियात होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. तेथे ते चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटणार नाहीत तसेच तेथील एकत्रित युद्धसरावातही हिंदुस्थान सहभागी होणार नाही, असे आता सांगण्यात येत आहे. राजनैतिक पातळीवर चीनला दिलेले हे प्रत्युत्तर चांगलेच आहे, पण सैनिकी पातळीवरही आपण काय करीत आहोत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हिंदुस्थानचे सैन्य कोणत्याही परकीय हल्ल्यास चोख उत्तर देण्यास समर्थ आहेच. केंद्रात कोणाची सत्ता आहे व कोण नेतृत्व करीत आहे याच्याशी सीमेवरील सैन्याला घेणेदेणे नसते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कमांडर्सचे आदेश सैन्य पाळत असते. 1971 व त्याआधी 1965चे युद्ध आमच्या सैन्याने जिंकले. कारगीलचे युद्धही सैन्यानेच जिंकले. 1962चे चीनबरोबरचे युद्ध आपण हरलो, पण आजचा हिंदुस्थान वेगळा आहे याची जाणीव चीनला असायलाच हवी. दोन देशांत चर्चा सुरू आहे, पण मार्ग निघत नाही. अशी चर्चा पाकिस्तानबरोबर 60-65 वर्षे सुरूच आहे. असे म्हणत शिवसेनेने वास्तविक परिस्थिती सांगितली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER