आता चर्चेच्या फेऱ्या थांबवून ठोस निर्णय घेण्याची गरज ; शेतकरी आंदोलनावरून राजू शेट्टींनी केंद्राला सुनावले

Raju Shetti

नवी दिल्ली : शेतकरी ऐन थंडीत १८ दिवस आंदोलन करतो आहे. १८ दिवस त्यांचं हे आंदोलन ताणणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली. आता चर्चेच्या फेऱ्या थांबवून ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचं राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितलं. याच वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या संयमाचे कौतुक केले. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलन कसं करायचं हे शेतकऱ्यांकडून शिकण्यासारखं आहे, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले आहे.

ते दिल्लीच्या सीमेवर सुरू  असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत पोहचले आहेत. जो नियम उसाला तोच नियम बाकी पिकांना असायला हवा, अशी तरतूद करणारा कायदा करा. मी स्वत: यासंबंधीचं खाजगी विधेयक २०१८ साली खासदार असताना मांडलं होतं. त्या विधेयकाला अनेक खासदारांनी पाठिंबा दिला होता. तेच विधेयक सरकारी विधेयक पाठिंबा म्हणून मांडावं, अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

सरकारने जाहीर केलेला हमीभाव तरी त्याला मिळेल आणि जो कोणी हमीभाव द्यायला टाळाटाळ करेल त्याला आम्ही तुरुंगात टाकू, असा विश्वास फक्त शेतकरी सरकारकडून मागतो आहे, असे ते म्हणाले. दुसरीकडे फक्त पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा या कायद्याला विरोध आहे. भाजपच्या या टीकेला उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले, जर महाराष्ट्रात कायद्याला विरोध नाही तर मग महाराष्ट्र बंद का झाला, असा उलट सवाल त्यांनी भाजपला विचारला. तसंच कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा बंदला प्रतिसाद का मिळाला? असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला  आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER