आता रवींद्र जडेजालाही दुखापत; भारतीय संघाच्या अडचणीत भर

Ravindra Jadeja

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या (India Vs Australia) कसोटी मालिकेतील दुखापतींचे सत्र थांबायला तयार नाही. ताज्या घटनेत चपळ क्षेत्ररक्षक, अष्टपैलू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) दुखापत झाली आहे आणि तो सिडनी कसोटीत (Sydney Test) पुढे गोलंदाजी करू शकेल अशी शक्यता कमीच आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या हातावर चेंडू जोराने आदळला आहे. फलंदाजी करताना मिचेल स्टार्कचा एका आखूड चेंडूचा त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर जबर मार बसला. त्यामुळे तो या सामन्यात आता पुढे गोलंदाजी करू शकेल अशी शक्यता कमीच आहे; कारण हाच त्याच्या गोलंदाजीचा हात असून त्याचे स्कॕनिंग करण्यात येत आहे.

हा मार बसल्यानंतर त्याला खूपच वेदना होताना दिसल्या आणि दुसऱ्या डावासाठी भारतीय संघ क्षेत्ररक्षणाला उतरला तेव्हा त्याचा डावा अंगठा चांगलाच सुजलेला दिसत होता आणि त्याच्यावर चिकटपट्टी लावलेली दिसत होती. त्याने काही काळ क्षेत्ररक्षण केले; पण वेदनांमुळे त्याला ते सोडून द्यावे लागले. जडेजाने २८ धावा केल्या आणि त्याच्या या खेळीनेच ऑस्ट्रेलियाची आघाडी १०० पेक्षा कमी धावांची राहिली.

शिवाय ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याने चार गडी बाद केले होते; शिवाय आपल्या चपळ क्षेत्ररक्षणात अफलातून ‘थ्रो’वर त्याने स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी संपवली होती. त्यामुळे रवींद्र जडेजाची ही दुखापत भारतीय संघाला मोठा धक्का आहे. आधीच भारताचे मोहम्मद शामी व उमेश यादव हे प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER