आता गृह विभागाचे विनोदी आवाहन…

Shailendra Paranjapeसरकारी पातळीवर रोजच्या रोज अनुभवाला येणाऱ्या विसंगती आणि त्यातून क्न्फ्यूज करून टाकणारी विधानं माध्यमांमधून आली की करोना परवडला पण या राजकारण्यांना आवरा, असं म्हणायची वेळ येतीय. असं वाटण्यासाठी गृह विभागानं दिवाळीच्या संदर्भात केलेली सूचना आणि त्यातले अंतर्विरोध कारणीभूत ठरलेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोनाची दुसरी लाट येईल असं वाटत नाही पण तरीही सावधगिरी बाळगायला हवी, असं बोथट आणि निश्चित भूमिका नसलेलं विधान काल परवा केलं. आता गृहविभागानं नागरिकांना विनंती केलीय की दिवाळी हा दिव्यांचा सण असल्यानं रोषणाई करा पण फटाके वाजवू नका.

सरकारी पातळीवर रोजच्या रोज जे काही विनोद केले जाताहेत, त्याचा हा उत्कृष्ट नमुना म्हणायला हवा. अर्थात, सरकारचे प्रमुख गेल्या सात महिन्यात फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी प्रभावी संवाद साधताहेत, तो लक्षात घेतला तर आरोग्य विभाग आणि गृहविभाग यांनी लोकांचा गोंधळ वाढवला तर त्यात काहीच वावगे नाही. किंबहुना, मुख्यमंत्री जे करताहेत त्याचीच पुढची पायरी हे परस्परविसंगत बोलणारे मंत्री गाठताहेत, हे समजून घ्यावे लागेल. समस्या अशी आहे की सामान्य नागरिकांना फक्त त्या त्या दिवशी वर्तमानपत्रातून तोडलेले अकलेचे तारेच दिसू शकतात. त्यामुळे हातात वात पेटून फटाका फुटावा आणि डोळ्यासमोर अंधारी यावी, तशी अंधारी लोकांना रोजच्या रोज सरकारी स्टेटमेंट्स पाहिली की डोळ्यासमोर येतेय.

आता गृह विभागानं सांगितलंय की फटाक्यांमुळे करोनाच्या रुग्णांना त्रास होईल म्हणून ते वाजवू नका. त्याउलट केवळ रोषणाई करा कारण दिवाळी किंवा दीपावली हा दिव्यांचा सण आहे. फटाक्यांमुळे प्रदूषण होते आणि त्यातून श्वसनाला त्रास होऊ शकते, हे खरेच आहे. पण पुण्याच्या अनेक भागात फटाक्यांच्या स्टॉल्सना परवानगी देण्यात आलीय. पण अचानक फटाक्यांचे दुष्परिणाम गृह विभागाला जाणवू लागतात, हे एक कोडेच आहे.

गृहविभागाच्या आवाहनात फटाके उडवू नका, या सूचनेबरोबरच दिवाळी पहाटसारखे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नयेत, असंही सुचवण्यात आलंय. मात्र, रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम किंवा आरोग्यविषयक उपक्रम घेण्यास हरकत नाही, असंही स्पष्ट करण्यात आलंय. सरकारचे एक खाते किंवा एक विभाग काय करतो, ते दुसऱ्याला माहीत नाही, याची अनेक उदाहरणे वेळोवेळी दिसतात. पण एकच विभाग परस्परविसंगत किंवा फक्त विनोदीच म्हणता येतील, अशा सूचना करू लागला आणि तोही गृहविभाग असेल तर त्याला हसावं की रडावं, असा प्रश्न येतो.

दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम करू नका, ही गृहविभागाची सूचना असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालंय. वास्तविक, मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला शुभवर्तमान समजलं की राज्यातली नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र, सरकार एकीकडं नाट्यगृहे खुली करत असतानाच सरकारचाच गृहविभाग दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम करू नका, असं सांगतं तेव्हा गोंधळ नाही होणार तर काय…

गृह विभागाच्या सूचनेनुसार रक्तदान शिबीर घेतलं तर करोना पसरणार नाही कारण ते घेताना सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल, मास्क लावला जाईल वगैरे. पण नाट्यगृहे चित्रपटगृहे सुरू करतानाची पूर्वअटच मुळात करोनाविषयक सारे निकष पाळण्याची आहे. तरीही गृह विभाग असल्या विनोदी सूचना काढत असेल तर घरातच गोंधळ होणार नाही तर काय…

फटाक्यांनी करोनातून बरे झालेल्यांना त्रास होऊ शकतो, तर मग घरोघरी दिवाळी काळात येणाऱ्या तळणाच्या वासानेही तो होईल. त्यामुळे घरात काहीही तळू नका. शंकरपाळे, करंज्या, चकल्या, चिवडे सारे विकतच आणा, ही सूचना करायला गृह विभाग बहुधा विसरला असावा. असो.

मी काळजी घेतोय, तुम्हीही घ्या. करोनाही काळजी घेईल. शेवटी काळजी ही महत्त्वाची. मुख्यमंत्रीही घेताहेत, मंत्रीही घेताहेत, आरोग्यमंत्रीही घेताहेत, गृहमंत्रीही घेताहेत. तुम्हीही घ्या. रक्तदान शिबिरात जा पण दिवाळी पहाट करू नका. दिवे लावा पण फटाके उडवू नका. फटाक्यांचे स्टॉल्स उघडलेत, ते लांबूनच बघून या आणि फटाक्यांचा असाही आनंद घ्या.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER