शिवसेनेच्या नेत्यांना शरद पवारांकडून अपेक्षा, आता उजनीचा वाद पवारांच्या दरबारी

Maharashtra Today

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातील उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी पुणे जिल्ह्यातील इंदापूरला पळवण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद रंगला असताना आता या वादात शिवसेनेने उडी घेतली आहे. उजनी धरणाच्या पूर्ण पाण्याचे वाटप झाले असताना इंदापूरला अतिरिक्त पाण्यासाठी परवानगीच कशी मिळू शकते? असा प्रश्न मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी उपस्थित केला आहे. तसेच या संदर्भात आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच हा वाद शरद पवार यांच्या मध्यस्तीने सोडवला जाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याबाबत माहिती देताना बागल म्हणाले की, या प्रश्नासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांना भेटून इंदापूरला देण्यात येणाऱ्या ५ टीएमसी पाण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी करणार आहोत. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे, त्यापैकी ६४ टीएमसी मृत साठा (अचल) व ५३ टीएमसी वापरातील पाणीसाठा (चल) आहे. वापरातील पाणी साठ्याचेच वाटप केले जाते. पण आतापर्यंत उजनी धरणाचे ५४ नाहीतर ८० टीएमसी पाण्याचे वाटप झालेले आहे. म्हणजेच मृत साठ्यामधीलही काही पाण्याचे वाटप हे हया आधी झालेले आहे, त्यामुळे अतिरिक्त पाणी वाटपास आमचा विरोध राहणार आहे, असे दिग्विजय बागल यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे सरकार अशाप्रकारचे निर्णय घेतात. उजनी धरणामध्ये इंदापूर तालुक्याचे पण योगदान आहे; परंतु त्यांना आधीच योग्यप्रमाणात पाण्याचे वाटप झालेले आहे. आज उजनी धरण पूर्ण होऊन ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी प्रकल्पग्रस्तांना आपल्या पायाभूत सोयी सुविधांसाठी आंदोलन करावे लागत आहेत. उजनी धरणाचे पाणी इतरत्र सोडण्याआधी उजनी धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना मदत करावी. त्यांना विश्वासात घेऊन कोणतेही निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी बागल यांनी बोलताना केली. सोलापूर जिल्ह्यात २०१६ मे मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्यास सुरुवात झाली असताना उजनी धरणामधून एक टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यावेळी शेतकऱ्यांची पिक वाचली होती, असेही शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांनी यावेळी नमूद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button