शरद पवार मुख्यमंत्र्यांवर नाराज, दिला महत्वपूर्ण सल्ला

Sharad pawar-Uddhav Thackeray

मुंबई : दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन (Rainy Session), राज्यातील कोरोनाची भयावह स्थिती आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून अभिनेत्री कंगना रणौतच्या आडून शिवसेनेवर केले जात असलेले राजकीय हल्ले. आणि त्यानंतर कंगना रनौत हिच्या कार्यालयावर महापालिकेने केलेली कारवाई म्हणजे विरोधकांना महाविकास आघाडी सरकारवर (MVA Govt) टीका करण्याची आयती संधी चालून आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे.

या सर्व घडामोडींवर नाराजी व्यक्त करण्यासाठी काल रात्री शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. कंगनावर कारवाई करण्याची वेळ चुकीची आहे. मुंबईत अनेक अवैध बांधकामे आहेत. अशा कारवाईमुळे निष्कारण शंकेची पाल चुकचुकते, अशा शब्दांत पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेनेला (Shivsena) टार्गेट करण्यासाठी भाजपाकडून कंगनाचा पुरेपूर वापर केला जात असून यासाठी शिवसेना वेळोवेळी अडचणीत सापडत आहे. त्यातच शिवसेनेकडून कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याने शिवसेना बरीच अडचणीत सापडली आहे. यामुळे पवारांनी यासंदर्भात काही राजकीय डावपेच कसे खेळायचे यासाठी शिवसेनेला काही सूचना या बैठकीत केल्या असल्याचे सांगण्यात येते.

तसेच मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (SC) अंतरिम स्थगिती देण्याचा निर्णय दिल्याने याविषयी भाजपाकडून सरकारची राजकीय कोंडी केली जाऊ शकते. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारकडून कोणकोणते पावले उचलले पाहिजे यावरही पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER