आता सैफ अली बनणार रावण

रामायणावर आधारित आणखी एक चित्रपट

Saif Ali Khan - Aadipurush

रामायण (Ramayan) हे असे महाकाव्य आहे ज्याचा केवळ भारतियांवरच नव्हे तर अनेक देशातील नागरिकांवरही आहे. रामाची पूजा करणारे जगभरात आहेत. रामायणातील अनेक घटना या चित्रपटाच्या कथेप्रमाणे असल्याने यावर आधारित अनेक चित्रपट तयार झाले आहेत. तसेच चित्रपटातही रामायण दाखवण्याचे अनेक प्रयोग झाले. त्यापैकी काही यशस्वी झाले तर काही अयशस्वी. देशात चित्रपट तयार होण्यास सुरुवात झाल्यापासून ते आतापर्यंत अनेक चित्रपटात रामकथा दाखवण्यात आली होती. अनेक नायकांनी रामाची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली होती. त्यात आता बाहुबलीमुळे लोकप्रिय झालेल्या प्रभासची भर पडत आहे.

या रामायणाचे शिवधनुष्य ओम राऊत (Om Raut) यांनी उचलले आहे. अजय देवगनसोबत तान्हाजी- द अनसंग हीरो हा सुपरहिट चित्रपट दिला होता. काही दिवसांपूर्वीच ओम राउतने आदिपुरुषबाबत सूतोवाच केले होते. टी सीरीज द्वारा निर्मित रामायणावर आधारित आदिपुरुष (Aadipurush) या चित्रपटात प्रभास रामाची भूमिका साकारणार आहे. मागच्या गुरुवारी प्रभासने सकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. रावणाची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता होती. आणि आज सकाळी पुन्हा सकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी स्वतः प्रभासनेच सोशल मीडियावर सैफ अली खान (Saif Ali khan) लंकेशच्या म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असणार असल्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये 7 हजार वर्षांपूर्वी एक बुद्धिमान दानव होता असा उल्लेख करीत सैफ अलीचा फोटो टाकला आहे.  सैफने ओम राऊतच्या तान्हाजीमध्ये खलनायक साकारला होता. त्यामुळेच त्याची रावणाच्या भूमिकेसाठी निवड केल्याचे सांगितले जात आहे. पुढच्या गुरुवारी सीतेची भूमिका करणाऱ्या नायिकेची घोषणा केली जाणार असून या भूमिकेसाठी कीर्ति सुरेशची निवड केल्याचे सांगितले जात आहे.

हा एक भव्य दिव्य बिग बजेट पौराणिक चित्रपट असणार आहे. यापूर्वीही रामायणावर आधारित अनेक पौराणिक चित्रपट आले होेेते. 1917 मध्ये सर्वप्रथम लंका दहन नावाने रामायणावर आधारित चित्रपट तयार करण्यात आला होता. या मूकपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन भारतात चित्रपटसृष्टीची सुरुवात करणाऱ्या महान फिल्ममेकर दादासाहेब फाळके यांनी केली होती. तेव्हा मुली चित्रपटात काम करीत नसल्याने अण्णा साळुंते नावाच्या अभिनेत्यानेच राम आणि सीतेची भूमिका साकारली होती. एक प्रकारे भारतीय चित्रपटसृष्टीत दुहेरी भूमिका साकारण्याची ही सुरुवात होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

1954 मध्ये विजय भट्ट यांनी दिग्दर्शित केलेला वाल्मिकी रामायणावर आधारित रामराज्य चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रामाची भूमिका प्रेम अदीब आणि सीतेच्या भूमिकेत शोभना समर्थ होत्या. हा त्या काळातला सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट होता.

1961 मध्ये आलेल्या संपूर्ण रामायण चित्रपटानेही प्रेक्षकांना अचंभित केले होते. बाबूभाई मिस्त्री द्वारा दिग्दर्शित या चित्रपटात महिपाल यांनी रामाची तर अनिता गुहा यांनी सीतेची भूमिका साकारली होती. हातात काहीही नवीन तंत्रज्ञान नसताना बाबुभाई मिस्त्री यांनी करामती करून स्पेशल इफेक्ट दाखवले होते. 1976 मध्ये बजरंगबली चित्रपट आला होता. हा चित्रपट हनुमानाची कथा सांगणारा होता आणि दारा सिंह यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी रामायण आणि महाभारत या मालिकांमध्येही हनुमानाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत यांनी केले होते आणि संगीत दिले होते कल्याणजी आनंदजी या जोडीने.

जीतेंद्रनेही रामाची भूमिका साकारली होती. 1997 मध्ये लव कुश नावाचा चित्रपट आला होता. यात जीतेंद्र राम तर रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारा अरुण गोविल लक्ष्मणाच्या भूमिकेत होता. सीता झाली होती जयाप्रदा आणि दारा सिंह यांनी नेहमीप्रमाणे हनुमानाची भूमिका साकारली होती.

याशिवाय दक्षिणेतही रामायणावर आधारित अनेक चित्रपट तयार झाले असून रामाची भूमिका करणाऱ्याला तेथे देव मानून त्याची पूजाही केली जात असे. यापैकी काही नायक पुढे त्या-त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही झाले होते. याशिवाय रामायणाला अॅनिमेशनपटाच्या रुपातही अनेक वेळा सादर करण्यात आले आहे. यात आता आदिपुरुषची भर पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER