आता २०२४ ची तयारी करा- दानवे

झाले ते झाले, चूक झाली आमच्याकडून, पुढे युती होणार नाही. आता पाच वर्षे पक्षाचे काम वाढवून २०२४ च्या निवडणुकीची तयारी करा, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी आढावा बैठकीत पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना केली.


नांदेड : झाले ते झाले, चूक झाली आमच्याकडून, पुढे युती होणार नाही. आता पाच वर्षे पक्षाचे काम वाढवून २०२४ च्या निवडणुकीची तयारी करा, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी आढावा बैठकीत पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना केली. दानवे यांनी मतदारसंघनिहाय मोजक्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

माजी महापौर अजयसिंह बिसेन म्हणाले, भाजपने जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविली असती तर नऊपैकी आठ जागा जिंकल्या असत्या; युती केल्यामुळे भाजपचे नुकसान झाले व पक्षाच्या नेत्यांनी नांदेडकडे लक्ष न दिल्यामुळे मृतप्राय झालेली काँग्रेस पुन्हा जिवंत झाली. अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढील काळात युती नकोच, असे मत व्यक्त केले. मात्र, काही कार्यकर्त्यांनी सत्तेत येण्यासाठी पुन्हा शिवसेनेशी समझोता करा, असाही सल्ला दिला.

महाराष्ट्रातील नवीन समिकरणाने भाजपच्या पोटात दुखत आहे : सामना

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची चांगली संधी भाजपकडे होती; परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन युती करावी लागली. गरज संपली की काही जण सोडून जातात. त्यामुळे दगाफटकाही झाला. आता युती नको, ही कार्यकर्त्यांची भावना ठीक आहे. याबाबत पुढे काय होईल हे सांगता येत नाही; परंतु २०२४ साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. चांगली जनाधार असलेली माणसे पक्षात आणा. तुमच्या मनातील भावना माहिती आहेत. पुढे युती होणार नाही, असे संकेत दानवे यांनी दिले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, तुषार राठोड, माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर, बापूसाहेब गोरठेकर, डॉ. धनाजीराव देशमुख, गंगाराम ठक्करवाड, गंगाधर जोशी, महानगराध्यक्ष प्रवीण साले, अ‍ॅड. चैतन्यबापू देशमुख, डॉ. अजित गोपछडे असे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तीन पक्ष एकत्र येऊन किमान-समान कार्यक्रम म्हणत सरकार स्थापनेचा विचार करत आहेत; पण यातील दोन पक्ष विरुद्ध टोकाच्या विचारधारेचे आहेत.

सरकार बनवणे इतके सोपे नाही. शिवसेनेने जनमताचा आदर करावा, जनमताचा आदर न करणाऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाही, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टोमणा मारला. सत्तास्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी दोनदा फोन केला होता; परंतु त्यांनी तो उचलला नाही. मुख्यमंत्रिपदाचा एकच हट्ट ते धरून बसले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठीचा कोणताही शब्द त्यांना भाजपकडून देण्यात आला नव्हता, असे दानवे यांनी पुन्हा स्पष्ट केले.