आता मध्य प्रदेशनेही केला नवा धर्मांतरबंदी कायदा

Court Order & Love Jihad

भोपाळ : ज्याला ‘लव्ह जिहाद’ असे म्हटले जाते असे खास करून हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांच्याशी मुस्लिम तरुणांनी विवाह करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मध्य प्रदेश सरकारनेही सोमवारी नवा धर्मांतरबंदी कायदा लागू केला. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या पाठोपाठ असा कायदा करणारे मध्य प्रदेश हे तिसरे ‘भाजपा’शासित राज्य आहे. मध्य प्रदेश धर्म स्वातंत्र्य अधिनियाम नावाचा सन १९६९ पासून लागू असलेला कायदा रद्द करून त्याऐवजी आता हा नवा धर्मस्वातंत्र्य कायदा केला गेला आहे. मंत्रिमंडळाने दोन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी यासंबंधीचा वटहुकूम जारी केला.

गैरसममजाने, लालूच दाखवून, धमकी देऊन, लग्नाचे आमिष दाखवून अथवा अन्य कोणत्याही तशाच प्रकारच्या गैरमार्गाने केले जाणारे धर्मांतर हा गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे. असे धर्मांतर व त्यातून केला जाणारा विवाह हे दोन्ही या कायद्याने अवैध ठरेल. जिचे असे सक्तीने धर्मांतर केले गेले आहे त्या व्यक्तीने स्वत: किंवा तिच्या कुटुंबियांनी तक्रार केली तरच किंवा अन्य कोणाच्या तक्रारीवर न्यायालयाने आदेश दिला तरच पोलीस अशा प्रकरणांचा तपास करू शकतील.

या कायद्यातील शिक्षेच्या ठळक तरतूदी अशा:

  • सक्तीने, फूस लावून, धमकीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर- किमान एक व कमाल पाच वर्षांची कैद आणि किमान २५ हजार रुपये दंड.
  • अल्पवयीन व्यक्ती, महिला अथवा अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तीचे वरीलप्रमाणे धर्मांतर- किमान दोन व कमाल १० वर्षांची कैद आणि ५० हजार रुपये दंड.
  • वरील प्रकारे सामूहिक धर्मांतर-किमान पाच व कमाल १० वर्षांची कैद आणि एक लाख रुपये दंड
  • स्वत:चा खरा धर्म दडवून ठेवून फसवणुकीने विवाह करणे-किमान पाच व कमाल १० वर्षांची कैद आणि एक लाख रुपये दंड

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER