आता करण जोहर सैफच्या मुलाला इब्राहिमलाही लाँच करणार

Maharashtra Today

बॉलिवूडमधील(Bollywood) नेपोटिझम म्हणजेच वंशवादावर आता चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. बॉलिवूडमधील मोठे बॅनर असलेल्या धर्मा प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा करण जोहर (Karan Johar) फक्त स्टार किड्सनाच संधी देत असतो असा जो आरोप केला जात असतो तो खरा असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच करणने अभिनेता संजय कपूरची मुलगी शनायाला लाँच करणार असल्याची घोषणा केली होती. करणच्या या कामामुळेच त्याला नेपोटिझमचा बादशाह असेही म्हटले जाते. मात्र बॉलिवूडमध्ये जेव्हा नेपोटिझमची चर्चा सुरु झाली तेव्हा याच करणने असे काही नाही असे म्हटले होते. आता करण जोहर आणखी एका स्टारकीडला बॉलिवूडमध्ये एंट्री देण्यास सज्ज झाला आहे. आणि हा स्टारकिड दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेता सैफ अलीचा मुलगा इब्राहिम (Ibrahim Ali Khan) आहे. सैफची मुलगी सारा अगोदरच बॉलिवूडमध्ये आलेली असून नायिका म्हणून तिने सध्या तरी चांगलेच यश मिळवलेले आहे.

इब्राहिम सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून सारासोबत (Sara Ali Khan) तो सतत फोटो शेअर करीत असतो. पित्याप्रमाणे त्यालाही नायक व्हायचे आहे, पण थेट नायक होण्यापेक्षा अगोदर सिनेमा माध्यमाचा अभ्यास करून नायक बनावे असा त्याचा विचार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करण जोहर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसणार असून तो एका नव्या सिनेमाला सुरुवात करणार आहे. या सिनेमासाठी त्याने रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांना मुख्य भूमिकांसाठी साईन केले आहे. याच सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने सैफचा मुलगा इब्राहिमला सोबत घेतले आहे. एखाद्या स्टारकिडला नायक किंवा नायिका म्हणून पडद्यावर आणायचे असेल तर त्याला सिनेमाची इत्यंभूत माहिती व्हावी म्हणून करण जोहर त्यांना त्याच्या सिनेमासाठी सहाय्यक म्हणून घेतो. त्यानंतर या मुलांना लवकरच तो नायक- नायिका म्हणून रुपेरी पडद्यावर आणतो. यापूर्वीही त्याने असे केले आहे आणि आता इब्राहिमलाही तो अशाच प्रकार संधी देत आहे.

करणचा हा नवा सिनेमा एक अॅक्शन लव्ह स्टोरी आहे. आलिया आणि रणवीरने गली बॉयमध्ये चांगली केमिस्ट्री दाखवली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर हिट झालाच होता समीक्षकांनाही आवडला होता. त्या सिनेमानंतर आता ही जोडी करणच्या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. रणवीर सध्या रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असून हा सिनेमा पूर्ण झाल्यावर रणवीर करणच्या या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहे. मात्र सिनेमाचे शूटिंग सुरु करण्यापूर्वी करण रणवीर आणि आलियासोबत एक अॅक्टिंग वर्कशॉप घेणार असून हा इब्राहिमचा पहिला धडा असेल असे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button