आता कंगना बनणार इंदिरा गांधी

Indira Gandhi - Kangana Ranaut

बॉलिवुडमध्ये (Bollywood) नायिकाप्रधान सिनेमे फार कमी बनतात. नायिका एकटीच्या खांद्यावर सिनेमा तोलून धरेल असा विश्वास निर्मात्यांना नसतो. त्यामुळे ते नायिकांना फक्त शो पीस म्हणून सिनेमात सादर करतात. मात्र काही नायिकांनी स्वतःच्या अभिनयाच्या बळावर त्यांच्यासाठी नायिकाप्रधान सिनेमे तयार करण्यास निर्मात्यांना प्रवृत्त केले आहे. अगदी सुरुवातीपासून नूतन, मीना कुमारी यांच्यापासून ते आताच्या विद्या बालन, कंगना रनौत (Kangana Ranaut), तापसी पन्नूपर्यंत काही मोजक्या नायिकांची नावे घेतली जातात ज्यांनी एकटीच्या बळावर सिनेमे फक्त तोलूनच धरले नाहीत तर बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशही मिळवले आहे.

कंगनाने काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता (Jayalalithaa) यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचेही शूटिंग पूर्ण केले आहे. कंगनाने राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची (Rani Lakshmibai) भूमिकाही साकारली होती. कंगना रनौत आता आणखी एका मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्यास सज्ज झाली आहे. पोलादी स्त्री म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या भूमिकेत कंगना दिसणार असून कंगनाने शुक्रवारी याची घोषणा केली. घोषणा झाल्याबरोबर कंगनाच्या या सिनेमाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. तीन वर्षांपूर्वी मधुर भांडारकरनेही इंदिरा गांधींच्या जीवनावर ‘इंदू सरकार’ नावाचा सिनेमा तयार केला होता. पण बॉक्स ऑफिसवर तो सुपरफ्लॉप ठरला होता.

कंगनाने शुक्रवारी तिच्या या नव्या सिनेमाची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट टाकून केली. या पोस्टमध्ये कंगनाने म्हटले आहे, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित एक पॉलिटिकल ड्रामा सिनेमा तयार होणार असून यात ती इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाची पटकथा तयार झाली असून उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

कंगनाने या सिनेमाबाबत अधिक माहिती देताना म्हटले आहे, हा सिनेमा इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित असला तरी तो त्यांचा बायोपिक नसून एक पॉलिटिकल ड्रामा असेल. आजच्या तरुण पिढीला इंदिरा गांधींच्या राजकारणाबाबत जास्त माहिती नाही. त्यांना या सिनेमाच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांनी राजकारण कसे केले त्याची माहिती दिली जाणार आहे. आणीबाणी आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टारची माहिती या सिनेमात दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

या सिनेमात इंदिरा गांधी यांच्यासोबतच संजय गांधी, राजीव गांधी, मोरारजी देसाई आणि लाल बहादुर शास्त्री यांचेही त्या काऴातील चित्रण दाखवले जाणार असून या भूमिकासांठी बॉलिवुडमधील मोठ्या कलाकारांना साईन केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. हा सिनेमा एका पुस्तकावर आधारित असल्याचे कंगनाने म्ह्टले आहे. परंतु पुस्तकाचे नाव तिने सांगितलेले नाही. या चित्रपटाची निर्मिती स्वतः कंगना करणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी या सिनेमाची पटकथा लिहिणाऱ्या साई कबीरवर सोपवली आहे. साई कबीरच्या ‘रिव्हॉल्व्हर रानी’ सिनेमात कंगनाने यापूर्वी काम केलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER