आता बाळासाहेबांची शिवसेना नाही, तर राऊत सेना झाली आहे – प्रमोद जठार

Pramod Jathar

सिंधुदुर्ग : केंद्रातील भाजपा (BJP) सरकारच्या प्रस्तावित प्रकल्पाना शिवसेना (Shiv Sena) विरोध करत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प, सी-वर्ल्ड प्रकल्प ,आयुर्वेदीक वनस्पतींवर संशोधन करणारे केंद्र असे प्रकल्प नको असतील तर ठाकरे सरकारला नेमके काय हवे आहे ? ते तरी त्यांनी स्पष्ट करावे. लोकोपयोगी प्रकल्प नाकारणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकारचा आम्ही धिक्कार करतो. असे भाजपा प्रदेश सचिव ,माजी आमदार प्रमोद (Pramod Jathar) जठार यांनी म्हटले आहे.

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. असे असतानाही आघाडी सरकारमधील काँग्रेसचा (Congress) मंत्री शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना पुरते ओळखले आहे. ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची स्वाभिमानी सेना राहिलेली नाही, ती आता राऊत सेना झाली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जर वनस्पती संशोधन प्रकल्प सिंधुदुर्गात झाला नाही तर आघाडी सरकारच्या मंत्र्यांना भाजपचे कार्यकर्ते सिंधुदुर्गात फिरकू देणार नाही. आम्ही आमच्या प्रयत्नाने आलेला प्रकल्प निदान राखण्याचे तरी कर्तृत्व शिवसेना नेत्यांनी दाखवावे. अन्यथा अशा कोकणातील विणकामाच्या नेत्यांचे सिंधुदुर्गातील फिरणे आम्हाला बंद करावे लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग- आडाळी येथील केंद्राच्या आयुष मंत्रालयाच्या आयुर्वेद संशोधन प्रकल्प हस्तांतरणावरून सुरू झालेला वाद अधिक पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

खासदार विनायक राऊत यांनी हा प्रकल्प पळवून नेण्याच्या आपल्याच आघाडी सरकारमधील सहकारी मंत्र्यांचा धिक्कार केला आहे. विकासासाठी केंद्र मोदी सरकारकडून (Modi Government) आम्ही मंजूर करून आणलेला प्रकल्प पळवित आहे,असेही प्रमोद जठार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनसुद्धा आघाडी सरकारमधील एक नवखा काँग्रेसचा मंत्री शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत व कुठल्याही पक्षात असले तरी ज्यांची विकास कामे कमी पण राजकारण तंत्र नेहमीच उच्च राहिले अशा उदय सामंतांच्या पत्रांना उत्तरे देत नाहीत. याचा अर्थ कांग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शिवसेना नेत्यांना आता पुरते ओळखले आहे. आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून सत्तेसाठी हिंदुत्व सोडून काहीही करण्यासाठी उद्धव ठाकरेंना भाग पाडणारी राऊत सेना झाली आहे. त्यामुळे ती काय कोकणाचा विकास करणार? असेही जठार यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER