मी माझ्या पक्षासाठी काय करू शकते, हे करून दाखवण्याची हीच वेळ आहे –ऊर्मिला मातोंडकर

Urmila-Matondkar

शिर्डी : साईबाबांच्या शिर्डी येथे कॉंग्रसतर्फे राज्यस्तरीय युवा मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराला अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उत्तर मुंबईमधून त्या कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीत उभ्या होत्या. मात्र,  देशभरातच कॉंग्रेसची जी वाताहत झाली त्याच्या बळी ऊर्मिला मातोंडकरदेखील झाल्यात. त्यांच्या विरोधात भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत बाजी मारली आणि मातोंडकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

ऊर्मिला मातोंडकर पुन्हा आता चर्चेत आल्या आहेत. त्यांचा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना धीर देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर हीट होत आहे.

या व्हिडीओमध्ये त्यांनी राज्यस्तरीय युवा मंथन शिबिराला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर त्या कॉंग्रेसच्या हताश, निराश झालेल्या कार्यकर्त्यांना धीर देताना दिसत आहेत.

त्या सांगतात, माझा दृढ विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीचं जे चरित्र असतं, जे धैर्य आणि सामर्थ्य असतं ते त्यांच्या चांगल्या नाही तर त्यांच्या पडत्या काळात भरभरून समोर येतं.  ते स्वतःच्या आणि समाजाच्या लक्षात येतं आणि अशी एक वेळ आपल्या सर्वांच्या सोबत उभी आहे. त्यामुळे आज गरज आहे की, आपलं धैर्य आणि सामर्थ्य पणाला लावून आपल्या पक्षाच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक जोरदार लढा दिला पाहिजे;

कारण हे भवितव्य सर्वांत  प्रथम तुम्हा सर्वांचं आहे. आपल्या देशाकरिता आपल्या कॉंग्रेसच्या ज्या मूळ तत्त्वांवरती आपण लढलो आणि लढत राहणार आहोत.  ती लोकशाहीची विकासाची सर्व तत्त्वे आपल्या उराशी खंबीरपणे बाळगून पुढे जाण्याची हीच ती वेळ आहे, असं ऊर्मिला या व्हिडीओमधून सांगत आहेत.

महाराष्ट्रात चंद्रपूर वगळता कोठेही कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. लोकसभेच्या निकालानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेसकडे नेतृत्वहीन कॉंग्रेस म्हणून पाहिले  जाऊ लागले.  त्याचा नकारार्थी परिणाम सर्वसामान्यांच्या मनावर झाला. पडलेली कॉंग्रेस आता उठायलाच तयार नाही अशीच धारणा कॉंग्रेस नेत्यांचीही झाली. झुंडीनं कॉंग्रेस नेते भाजपत प्रवेश करू लागले.