आता राजकीय मैदानात मनसे आक्रमक, नामांतराच्या मुद्द्यावरून थेट खैरेंची गाडी अडवली

MNS

ओरंगाबाद : आगामी निवडणुका लक्षात घेता आता राजकीय मैदानात मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. एकेकाळी जी शिवसेना मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारायची आता त्याच शिवसेनेच्या नेत्यांच्या गाड्या अडवण्यासाठी मनसेने सुरूवात केली आहे. आज मनसेने शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची गाडी अडवली. त्यांना जाब विचारला आणि त्यांच्या अंगावर पत्रकं फेकून जोरदार घोषणाबाजीही केली.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मनसेने आज औरंगाबादमद्ये मुख्यमंत्र्यांच्या दौ-यापुर्वीच राडा केला. त्यामुळे औरंगाबादेत मनसेचं बळ वाढत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ असं करण्याचा अल्टिमेटम मनसेने शिवसेनेला दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

यावेळी खैरे यांनी मनसे (MNS) सैनिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक मनसे सैनिकांनी जोरजोरात घोषणाबाजी करत औरंगाबादचं नामांतर का होत नाही? असा जाब खैरे यांना विचारला. त्याचवेळी मनसे सैनिकांनी शिवसेनेच्या निषेधाची पत्रकं खैरे यांच्या अंगावर फेकून दिली. यावेळी मनसे सैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी,’ आणि ‘धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या खैरेंना गप्प उभं राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

तर, औरंगाबादचं नामांतर करणं ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचीच इच्छा होती. त्यामुळे शिवसेनेने बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करावी. आम्ही बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच रस्त्यावर उतरलो आहोत, असं मनसे सैनिकांनी सांगितलं. यावेळी खैरे यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न लवकर मार्गी लागेल असं स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER