आता स्थानिक प्रकरण पवारांसाठी राष्ट्रीय कसे झाले? चंद्रकांत पाटलांचा वर्मावर घाव

Sharad Pawar & Chandrakant Patil

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कोणाच्या तरी दबावात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याचा दावा आघाडी सरकारचे नेते करत आहेत. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी परमबीर सिंग यांची बाजू घेतली आहे. परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका खोटी आहे का? असा उलट प्रश्न करत त्यांनी आघाडीच्या नेत्यांवरच निशाणा साधला.

प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देशमुख यांच्यासाठी वकिली करणारे व त्यांची सातत्याने पाठराखण करणारे शरद पवार यांनी आता तरी महाराष्ट्राची बेअब्रू रोखावी व त्यांच्या आरोपांचे उत्तर देऊन तत्काळ देशमुखांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

शिवसेनेशी संबंधित सचिन वाझेंचे (Sachin Vaze) प्रकरण हे स्थानिक पातळीचे असल्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही, असे विधान करणाऱ्या शरद पवार यांना परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर बहुतेक हे प्रकरण मोठे राष्ट्रीय पातळीचे असल्याचे वाटत असावे म्हणूनच कदाचित पवारांना सलग दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर देशमुख यांना वाचविण्यासाठी पत्रकार परिषदांचा सपाटा सुरू केला असावा, असा मार्मिक टोलाही त्यांनी लगावला.

सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी गोळा करण्याचे आरोप केल्यानंतर हे सर्व आरोप कसे चुकीचे होऊ शकतात, ते पत्रच खोटे आहे, असे पवार म्हणाले आहेत. त्यांच्या पत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्या पत्रातील नोंदीनुसार सचिन वाझे व देशमुख यांची भेटच झाली नसल्याचे तारखांचे दाखले पवारांनी तातडीने दिल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र सिंग यांनी ते पत्रच लिहिले नसते तर त्यांनी पोलीस सेवेत असतानाही गृहमंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल का केली असती? याचे उत्तर पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले. पुरावे नष्ट करण्याआधीच देशमुख यांच्याविरोधात खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशीची मागणी सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केली असेल तर न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिकासुद्धा खोटी आहे का? असा सवालही त्यांनी केला.

दोन दिवस झाले तरीही महाराष्ट्राच्या अब्रूचे  धिंडवडे काढणाऱ्या या गंभीर पत्राच्या चौकशीचे साधे आदेश अद्यापही महाविकास आघाडी सरकारने दिलेले नाहीत. विशेष म्हणजे सिंग यांच्या लेटरबॉम्बमध्ये खुद्द शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. ज्या अर्थी पवार यांनी याबाबत कुठेही इन्कार केला नाही, त्या अर्थी या पत्रामध्ये तथ्य असल्याचे सिद्ध होते, मग सत्तेच्या लालसेपोटी पवार या प्रकरणात नक्की कोणाच्या कृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा सवालही त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसचाही पवारांच्या सुरात सूर, देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे केले स्पष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER