गडकरीही तुकाराम मुंढेंच्या विरोधात; केंद्राकडे केली तक्रार

Nitin Gadkari-Tukaram Munde

नागपूर :- तुकाराम मुंढे विरुद्ध भाजप हा वाद आता चांगलाच चिघळलेला दिसत आहे. कारण साधारणतः पक्षीय राजकारण किंवा अधिका-यांच्या कोणत्याही निर्णयात सहसा हस्तक्षेप न करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंढेंच्या विरोधात थेट केंद्राकडे तक्रार दाखल केली आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पात तुकाराम मुंढे यांनी घोटाळा केल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला आहे. या घोटाळ्यासंबंधी गडकरी यांनी केंद्राकडे पत्र पाठवले आहे.

‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’चे सीईओ तुकाराम मुंढे यांचे अवैध, असांविधानिक आणि घोटाळेबाज वर्तन असल्याचे पत्र गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना लिहिले आहे.

नागपूरचे आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या सीईओपदाची जबाबदारी अवैधरीत्या बळकावल्याचा आरोप गडकरींनी केला आहे.

निविदा रद्द करणे, कोरोनासारख्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना टर्मिनेट करणे असे निर्णय मुंढे यांनी घेतल्याचा दावाही गडकरींनी पत्रात केला आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’मध्ये २० कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला होता. याशिवाय तुकाराम मुंढे यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिले, असा आरोपदेखील त्यांनी केला होता.

मुंढेंच्या विरोधात आता गडकरीही उतरले आहेत. त्यामुळे गडकरींच्या पत्रानंतर मुंढेंवर काय कारवाई होणार हे पाहावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER