आता विशेष समितीसाठी फील्डिंग

E-postal service in Kolhapur Zilla Parishad

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत पराभव झालेल्या भाजप प्रणित आघाडीत सामसूम आहे. मात्र, उद्या होणाऱ्या सभापतीपदाच्या निवडीवरून शिवसेनेत धुमशान सुरू झाले आहे. गटातटात विभागलेल्या शिवसेनेच्या वाट्याला तीन सभापती पदे येणे अपेक्षित आहे. मात्र, आपल्याच गटाला सभापतीपद मिळाले पाहिजे, असा प्रत्येक गटाचा आग्रह आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषदेतील सत्तारुढ महाविकास आघाडीकडे ४३ सदस्यांचे पाठबळ आहे. तर भाजप प्रणित आघाडीचे संख्याबळ २३ पर्यंत घसरले आहे. परिणामी महाविकास आघाडीचेच सभापती होणार हे निश्चित आहे. महाविकास आघाडीने सत्तेची जुळवाजुळव करताना पदाधिकाऱ्यांसाठी एका वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. वर्षभरानंतर सहाही पदाधिकाऱ्यांना बदलण्यात येणार आहे.

दरम्यान समिती सभापतिपदाच्या चारपैकी तीन पदे शिवसेनेच्या वाट्याला तर एक पद इतर मित्र पक्ष व अपक्षासाठी असा फॉर्म्युला ठरला आहे. बांधकाम, शिक्षण समिती सभापतिपदासाठी शिवसेना व मित्रपक्षांत रस्सीखेच आहे. शिवसेनेचे सदस्य हंबीरराव पाटील, प्रविण यादव यांना ‘बांधकाम’हवे आहे. अपक्ष सदस्या रसिका पाटील यांनीही या पदासाठी दावा केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पद्माराणी पाटील यांचा शिक्षण समिती सभापतिपदासाठी प्रयत्न आहे. शिवसेनेच्या वंदना जाधवसुद्धा शिक्षणसाठी इच्छूक आहेत. हंबीरराव पाटील यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. यामुळे सरुडकर गटाच्या दुसऱ्या सदस्या आकांक्षा पाटील यांचे नाव बांधकाम समितीच्या शर्यतीत आहे. समाजकल्याण समिती सभापतिपदासाठी शिवसेनेच्या सद स्पर्धक आहेत. नरके गटाकडून कोमल मिसाळ, मनिषा कुरण व माजी आमदार उल्हास पाटील गटाकडून सदस्या स्वाती सासने यांच्यामध्ये स्पर्धा आहे.