केंद्राची घोषणा : आता ४५ वर्षांवरील सर्वांनाच कोरोनाची लस मिळणार

नवी दिल्ली : आज केंद्र सरकारने मोठी घोषणा केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत दिली. ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. भारतामध्ये अत्यंत वेगाने आणि योग्य पद्धतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण केलं जात आहे. आतापर्यंत ४ कोटी ८५ लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी चार कोटींपेक्षा जास्त असे व्यक्ती आहेत ज्यांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ८५ लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, असं जावडेकरांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. त्याचप्रमाणे मागील २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार जणांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत, असंही जावडेकरांनी सांगितलं. फेब्रुवारीमध्ये दिवसाला ३ लाख ७७ हजार कोरोनाचे डोस दिले जायचे. मार्च महिन्यात ही दैनंदिन आकडेवारी १५ लाख ५४ हजारांपर्यंत गेली आहे, असंही जावडेकरांनी स्पष्ट केलं. मागील आठवड्यामध्ये (१४ ते २० मार्च दरम्यान) दिवसाला कोरोना लसींचे २० लाख डोस देण्यात आल्याची माहितीही जावडेकरांनी दिली.

पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवा आणि कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १६ फेब्रुवारीपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. त्यानंतर १ मार्चपासून ४५ हून अधिक वय असणाऱ्या आणि इतर व्याधी असणाऱ्यांचं लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोरोना टास्क फोर्सचा सल्ला आणि वैज्ञानिक आधारांच्या साहाय्याने दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यापैकी पहिला निर्णय म्हणजे ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे, असं जावडेकरांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

तसेच या बैठकीमधील दुसरा महत्त्वाचा निर्णय असा घेण्यात आला आहे की, दोन डोस दरम्यान चार किंवा सहा आठवड्यांचा वेळ असावा, असं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र आता कोविशिल्डचा डोस चार ते आठ आठवड्यांच्या दरम्यान घेणं योग्य ठरेल, असं संशोधकांना दिसून आलं आहे. त्यामुळे ही सवलतही देण्यात आली आहे. कोरोनाची लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, असंही जावडेकरांनी सांगितलं आहे. भारतात निर्माण केलेल्या कोरोनाच्या दोन्ही लसी उत्तम परिणामकारक आहेत. खुद्द पंतप्रधान मोदींनी कोव्हॅक्सीन लस घेत या मोहिमेचा शुभारंभ केला होता, असं जावडेकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER