आता दिल्लीने महाराष्ट्राकडून कोरोना नियंत्रण शिकावे; नवाब मलिकांचा टोला

Nawab Malik

मुंबई : मुंबईत कोरोना का वाढतो? तुम्हाला नियंत्रणात का आणता येत नाही? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच अनेक सनदी अधिकाऱ्यांसह २८ हजारांहून अधिक लोक कोरोना बाधित का झाले याचे उत्तर कोण देणार? असा सवाल एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने विचारले. श्रीमंत वा गरीब असा भेदभाव करत नसतो, असे सांगून दिल्लीने आता कोरोना नियंत्रणात कसा आणायचा ते महाराष्ट्राकडून शिकावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

कोरोनाने दिल्लीतच नव्हे तर उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगडसह अनेक राज्यांत भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. दिल्लीतील अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनचा साठा १२ ते १६ तास पुरेल एवढाच असल्याचे दिसत आहे. दिल्लीमधून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पथके वेळोवेळी महाराष्ट्रात येत होती व महाराष्ट्राला कोरोना नियंत्रणात का आणता येत नाही? असे सवाल केले जात होते. यावरून केंद्रातील मंत्री व राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपही झाले होते. महाराष्ट्राला पुरेशा लसी केंद्राकडून मिळत नसल्याने ऑक्सिजन पुरवठ्यासह अनेक मुद्दे मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून उपस्थित होत होते. तर केंद्रातील आरोग्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांकडून लसीकरण योग्य होत नसल्याने अनेक मुद्द्यांवर टीका होत होती.

पायाखाली काय जळते हे केंद्राने पाहावे
याच्या उलट परिस्थिती दिल्लीत होती. कोरोना संपला म्हणून बहुतांश लोक मास्क वापरत नव्हते. तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचा विसर पडला होता. एवढेच नव्हे तर स्विमिंग पूलही खुले करण्यात आले. पंतप्रधान मोदी अनेक राज्यांत निवडणूक सभांचा धुरळा उडवत फिरणार आणि लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असल्याचे राज्यांना सांगणार. उत्तरप्रदेशमध्ये उच्च न्यायालयानेच लॉकडाऊन जाहीर केला. काही राज्यांत आता लॉकडाऊन जाहीर झाले तर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनली. आता दिल्लीची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

“देशभरात लसीकरण मोहीम राबवायला हवी. २५ वर्षांपुढील सर्वांना लस द्या, असे सातत्याने महाराष्ट्र सांगत होता. आता पंतप्रधानांनी १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली आहे. कोरोना नियंत्रणावरून आता तरी दिल्लीने महाराष्ट्रावर टीका करू नये, असे सांगून आपल्या पायाखाली काय जळते आहे ते केंद्राने पाहण्याची गरज आहे. कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर महाराष्ट्राकडून नक्कीच शिकण्यासारखे आहे.” असेही नवाब मलिक म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button