काँग्रेसला अजूनही अध्यक्ष नाही? दीक्षित यांचा थेट सवाल

नवी दिल्ली :- दिल्लीत ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झालेत. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. मागच्याही निवडणुकीत काँग्रेसला भोपळा फोडता आला नव्हता. दिल्लीतील काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळे काँग्रेस नेते आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांनी आपल्या मनातील अंसतोषाला वाट मोकळी करून दिली आहे.

फडणवीस यांनी वाटलेल्या क्लीन चिट उद्धव फाडणार

इतके महिने होऊनही काँग्रेसला अजून अध्यक्ष मिळत नाही? असा सवाल त्यांनी आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना केला आहे. संदीप दीक्षित हे नवी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचे सुपुत्र आहेत, हे येथे उल्लेखनीय. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दीक्षित म्हणाले, सर्वात मोठी समस्या अशी आहे, की आमचे वरिष्ठ नेते घाबरतात. मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? हा त्यांच्यापुढचा प्रश्न आहे. खरे तर, सहा ते आठ जण अखिल भारतीय अध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे आहेत. काही वरिष्ठ नेत्यांना काही होऊच नये, असे वाटते, असा आरोप यावेळी दीक्षित यांनी केला.

माजी खासदार संदीप दीक्षित म्हणाले, अमरिंदर सिंग, अशोक गहलोत, कमलनाथ, अँथोनी, चिदम्बरम्, सलमान खुर्शीद, अहमद पटेल या नेत्यांनी पुढे यायला हवे. सध्या स्थिती अशी आहे की, सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष आहेत. राहुल गांधी यांना अध्यक्ष व्हायचे नाही. त्यामुळे त्यांचा आदर करीत पक्षाने पुढे गेले पाहिजे! राहुल गांधी यांनी नवीन अध्यक्ष निवडायला वरिष्ठ नेत्यांना सांगितले होते. परंतु, ही मंडळी अपयशी ठरली. काँग्रेसमध्ये नेते नाही आहेत का? नवीन लोक दिसत नाहीत का? असा सवाल या मुलाखतीमध्ये संदीप दीक्षित यांनी केला. यावेळी दीक्षित म्हणाले, आमचे काही नेते लेख लिहितात. पुस्तके लिहितात, मात्र, पक्षाला एकत्र कां आणीत नाहीत, असा माझा सवाल आहे!