आता काँग्रेसही सक्रिय; दोन दिवस मॅराथॉन बैठक

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून सतत नवनवीन राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. एकीकडे राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या महाविकास आघाडी सरकारसाठी चिंतेचा विषय बनत आहे. तर दुसरीकडे कायदा-सुव्यवस्थाही बिघडली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना नेते संजय राठोड यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्युप्रकरण तसंच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि त्यानंतर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पैसे वसुलीचे टार्गेट देण्याचे झालेले आरोप, या सगळ्या घडामोडींमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन झाली. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी दोन दिवसांची बैठक होत असून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रभारी एच. के. पाटील हे आजपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.

काँग्रेसच्या दोन दिवसां च्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई प्रदेश काँग्रेस अशा दोन पातळीवरील नेत्यांशी चर्चा होणार आहे. राज्यातील सध्याचा महाविकास आघाडीमधील राजकीय परिस्थितीचा रिपोर्ट काही दिवसांपूर्वीच दिल्लीत काँग्रेस हायकमांडने मागवून घेतला होता. त्यावर आज एच. के. पाटील हे राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मोठ्या कार्यकारिणीसमवेत पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक होणार होती. पण सध्याची कोरोना रुग्णसंख्या पाहता काही मोजक्याच काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत पाटील चर्चा करणार आहेत. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तसंच सरचिटणीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत काँग्रेस राजकीय परिस्थितीचा आढावा तर घेणारच आहे, त्याच वेळी राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानेदेखील विचारमंथन करणार आहे. दुसरीकडे, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेश कार्यकारिणीला काँग्रेस नेतृत्व राजकीय अजेंडा देण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष एकत्र असले तरी मुंबई महापालिकेत काँग्रेसला स्वतःचे अस्तित्व दाखवणे गरजेचे आहे. या अनुषंगानेदेखील काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रदेशपातळीवर काही महत्त्वपूर्ण कार्यक्रम दिले जातील, तसंच राज्यातील काँग्रेस मंत्र्यांच्या कामाचा आढावाही राज्य प्रभारी एच. के. पाटील हे घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button