आता टेनिसमध्येही चेंडूशी छेडछाड

जॉन मिलमानवर बदमाशीचा आरोप

John Millman

मेलबोर्न : क्रिकेटमध्ये चेंडूशी छेडछाड करण्याची बदमाशी अधूनमधून होतच असते. त्यात बड्या बड्या क्रिकेटपटूंना शिक्षासुध्दा झाली आहे. टेनिसमध्ये अशी बदमाशी सहसा ऐकायला मिळत नाही. पण यंदाच्या आस्ट्रेलियन ओपनमध्ये अशी बदमाशी आस्ट्रेलियन टेनिसपटू जॉन मिलमान याने केल्याची चर्चा जोरात आहे. तिसऱ्या फेरीच्या ज्या पाच सेट रंगलेल्या सामन्यात त्याने रॉजर फेडररसारख्या दिग्गजाला चांगलाच घाम गाळायला लावला, त्याच सामन्यात त्याने जाणूनबुजून चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप झाला आहे.

अतिशय अटीतटीचा झालेला हा सामना फेडरर 4-6, 7-6, 6-4, 4-6, 7-6 (10-8) असा जिंकण्यात यशस्वी झाला. यातील शेवटच्या सेटच्या टायब्रेकरमध्ये मिलमान 8-4 असा आघाडीवर होता मात्र त्यानंतर फेडररने ओळीने सहा गूण घेत हा सामना जिंकला.

एकाच दिवसात तीन भारत-न्यूझीलंड सामने

मिलमानने या सामन्यात खूप झुंजवले असे खुद्द फेडररने सामन्यानंतर मान्य केले. मात्र या सामन्यादरम्यान आपल्या सर्व्हिसची तीव्रता वाढविण्यासाठी मिलमानने अवैध तंत्राचा वापर केल्याचा आरोप माजी खेळाडू व ख्यातनाम प्रशिक्षक स्वेन ग्रोनवेल्ड यांनी केला आहे. नेदरलँडचे ग्रोनवेल्ड हे शारापोव्हा व इव्हानेवीचसारख्या खेळाडूंचे प्रशिक्षक होते. त्यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे की, मिलमान सर्व्हिस करण्याआधी आपल्या घामाने भिजलेल्या शर्टवरून मुद्दाम चेंडू फिरवत होता जेणेकरून चेंडू ओलसर होऊन त्याच्या सर्व्हिसची गती वाढेल.

आपल्या एका व्टिटमध्ये ग्रोनवेल्ड यांनी हा आरोप केला आहे. चेंडू ओलसर करणे हे नियमाला धरुन आहे का, असा प्रश्नसुध्दा त्यांनी केला आहे.

सेटस् नावाच्या एका स्वतंत्र सल्लागार समितीनेसुध्दा या मुद्यावर आपले मत मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या नियमांमध्ये अशा प्रकाराचा कोणताही उल्लेख नाही पण अमेरिकन टेनिस संघटनेने असा प्रकार अनैतिक व अवैध असल्याचे म्हटले आहे.