आता गुरुदत्तच्या जीवनावरही चित्रपट

Guru Dutt - Geeta Dutt

बॉलिवुडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या जीवनावर चित्रपट तयार केला तर प्रेक्षकांना तो पाहायला आवडेल. अगदी पृथ्वीराज कपूरपासून ( Prithviraj Kapoor) शाहरुख खानपर्यंत (Shahrukh Khan) आणि नरगिसपासून ते आताच्या कंगना रनौतपर्यंत (Kangana Ranaut) अशी अनेक नावे आहेत. या कलाकारांनी स्वबळावर बॉलिवुडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. या दरम्यान अनेक संकटांनाही त्यांना सामोरे जावे लागले आहे. तरीही त्यांनी संघर्ष करीत स्वतःचा दबदबा निर्माण केला. यापैकी काही जणांचे जीवन तर ट्रॅजेडीने भरलेले होते. यात गुरुदत्त (Guru Dutt), मीना कुमारी, कमाल अमरोही, संजीव कुमार अशी अनेकांची नावे घेता येतील.

याच नावांपैकी एक नाव आहे गुरुदत्त. कागज के फूल, प्यासा असे अजरामर चित्रपट देणाऱ्या गुरुदत्त यांचे जीवन म्हणजे चढउताराचा चांगला नमूना आहे. त्यातच वैयक्तिक आयुष्यातही त्यांना सुख मिळालेच नाही. याच गुरुदत्त यांच्या जीवनावर राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रख्यात दिग्दर्शिका भावना तलवार प्यासा या नावाने चित्रपट तयार करण्याची योजना आखत आहे. भावनाने चित्रपटाची तयारी सुरु केली असून कलाकारांची लवकरच निवड केली जाणार आहे. भावनाने चित्रपटाबाबत माहिती देताना सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून ती चित्रपटाच्या कथेवर काम करीत होती. एक टेलिफोन ऑपरेटर ते सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्माता असा गुरुदत्ता यांचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात येणार आहे. गुरुदत्त यांचे जीवन लार्जर दॅन लाइफप्रमाणे होते. केवळ दहा वर्षात त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. ते केवळ निर्माताच होते असे नाही तर ते एक चांगले लेखक, दिग्दर्शक, वितरक आणि अभिनेताही होते. गीत दत्तबरोबर प्रेम आणि त्यानंतरचे त्यांचे जीवन एखाद्या गूढ कथेप्रमाणे आहे. सर्वगुणसंपन्न अशी फार कमी लोकं इंडस्ट्रीत सापडतात. त्यामुळेच त्यांच्या जीवनातील लहान लहान प्रसंग एकत्र करून कथा लिहिण्यासाठी सात वर्ष लागली. आजच्या पिढीला गुरुदत्त यांचे खरे जीवन दाखवून त्यांची महती सांगण्याचा या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत असे भावनाने सांगितले.

काही दिवसांपूर्वी मीना कुमारी यांच्या जीवनावरही चित्रपट काढला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. अश्वनी भटनागर यांनी लिहिलेल्या मेहजबीन अॅज मीनाकुमारी पुस्तकावर आधारित प्रभलीन कौरने मीनाकुमारीच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याची घोषणा केली होती. परंतु मीनाकुमारीच्या सावत्र मुलाने ताजदार अमरोहीने यावर आक्षेप घेतल्याने तो चित्रपट बारगळला. पाच वर्षांपूर्वी तिग्मांशु धुलियानेही कंगनाला घेऊन मीनाकुमारीच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याची योजना आखली परंतु ती पूर्णत्वास गेली नाही. कंगनाने भूमिका साकारण्यास नकार दिल्यानंतर विद्या बालनला विचारण्यात आले. परंतु विद्या बालननेही (Vidya Balan) याला नकार दिला होता. याच विद्याने नंतर दक्षिणेतील सेक्सी अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित डर्टी पिक्चरमध्ये सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. तर कंगना आता जयललिता यांच्या जीवनावरील जया अम्मा चित्रपटात जयललिता यांची भूमिका साकारत आहे.

दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी सोहा अली खानला घेऊन खोया खोया चांद चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट मीनाकुमारीच्या जीवनावर आधारित होता असे म्हटले जाते.

किशोर कुमार (Kishor Kumar) यांच्या जीवनावरही चित्रपट निर्माण करण्याची घोषणा यूटीव्हीने केली होती. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार आणि पत्नी लीना चंदावरकर यांनीही या प्रोजेक्टला मान्यता दिली होती. रणबीर कपूर किशोर कुमारची भूमिका साकारणार होता. परंतु हा प्रोजेक्टही पूर्णत्वास गेला नाही.

याबाबतीत संजय दत्त (Sanjay Dutt) मात्र सुदैवी ठरला आणि रणबीर कपूरही. राजकुमार हिरानी यांनी संजय दत्तच्या जीवनावर संजू चित्रपट तयार केला आणि रणबीर कपूरला किशोर कुमार नाही तर संजय दत्त तरी पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली. संजूने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. दक्षिणेतील आणि हॉलिवुडमधील अनेक कलाकारांवर त्या-त्या भाषेत चित्रपट तयार झाले आहेत परंतु हिंदीत मात्र असे धाडस करताना फार कमी निर्माते दिसून येतात. गुरुदत्तचा हा प्यासा पूर्ण व्हावा आणि प्रदर्शित व्हावा एवढीच सदिच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER