आता नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या जीवनावर बनणार वेब सीरीज

Web Series on Naxal Attack

देशाच्या सीमांचे रक्षण करताना अनेक सैनिक शहीद झाले. मात्र शहीद होण्यापूर्वी या सैनिकांनी मोठी कामगिरी करीत शत्रूला यमसदनी धाडलेले असते. त्यामुळे त्यांच्या कथा रुपेरी पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या जातात आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. ज्याप्रमाणे देशाच्या सीमेची रक्षा हे सैनिक करतात त्याचप्रमाणे देशातील नक्षलींना रोखण्याचे काम सीआरपीएफचे जवान करीत असतात. आपल्याच देशातील बांधवांशी त्यांना लढाई करावी लागते. नक्षली छुपे युद्ध करीत असल्याने या सैनिकांना जीव तळहातावर ठेवूनच काम करावे लागते. नक्षली हल्ल्यात आजवर सीआरपीएफचे शेकडो जवान शहीद झालेले आहेत. या जवानांच्या कथा मात्र प्रेक्षकांसमोर आलेल्या नाहीत. मात्र आता शहीद झालेल्या सीआरएफच्या जवानांच्या कथा वेब सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

देशात आतापर्यंत सीआरपीएफचे (CRPF) २,२२४ जवान विविध मोहिमांमध्ये शहीद झालेले आहेत. यातील निम्मे जवान तर छत्तीसगडमधील नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले आहेत. गेल्या २० वर्षांत छत्तीसगडमध्ये १२०० जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्रातही गडचिरोली, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड येथे नक्षल्यांच्या हल्ल्यात सीआरएफचे जवान शहीद झालेले आहेत. या शहीद सीआरपीएफ जवानांची गाथा पडद्यावर आणण्यासाठी सीआरएफने स्लो कंटेंट प्रा. लिमिटेडसोबत एक एमओयू केला आहे. सीआरपीएफच्या सेंट्रल झोनचे स्पेशल डीजी कुलदीप सिंह यांनी सांगितले, सीआरपीएफच्या जवानांच्या शौर्याची गाथा फक्त त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांपुरतीच मर्यादित राहाते. त्यांची गाथा-कथा आम्ही प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न या वेब सीरीजद्वारे करणार आहोत. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा कार्यक्रम असेल आणि या कार्यक्रमामुळे सीआरपीएफच्या जवानांचे मनोधैर्य तर वाढेलच, तरुणांनाही सीआरपीएफ जॉईन करण्याची इच्छा जागृत होईल हा या वेबसीरीज बनवण्यामागे आमचा मुख्य उद्देश आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात छत्तीसगडमधील २० शहीदजवानांची कथा प्रेक्षकांसमोर आणली जाणार आहे. यात सीआरपीएफचे जवान काम करताना दिसणार आहेत. तसेच नीलेश मिसराच्या आवाजात या कथांची ऑडिओ सीरीजही तयार केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER