नोव्हाक जोकोवीचला अपात्रतेची शिक्षा, युएस ओपनमधून झाला बाद

Novak Djokovic

जगातील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic) याच्यासाठी यंदाचे वर्ष यशाचे तेवढेच वादग्रस्त ठरत आहे. कोरोना काळात जैव सुरक्षा नियमांचा अवलंब न करता प्रदर्शनी सामने आयोजित केल्याबद्दल टीकेचा धनी ठरल्यावर रविवारी यूएस ओपन टेनिस (US open tennis). स्पर्धेतून बाद होण्याची वेळ त्याच्यावर आली.

चौथ्या फेरीच्या सामन्यात त्याने सहजपणे फटकावलेला चेंडू कोर्टवरील लाईन जज (Line judge) महिलेला लागल्याने त्याला आयोजकांनी थेट स्पर्धेसाठीच अपात्र ठरवले. ही घटना जाणीवपूर्वक नाही तर अपघाताने घडली असली तरी अखिलाडूवृत्तीच्या वर्तनासाठी आणि मैदानावर शारीरिक हानी पोहोचवल्यासाठी त्याला नियमानुसार आयोजकांनी पुढील सामने खेळण्यास अपात्र ठरवले.

चौथ्या फेरीच्या सामन्यात स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बस्टाविरुध्द (Pablo carreno Busta) पहिल्या सेटमध्ये 5-6 असा जोकोवीच पिछाडीवर पडल्यावर ही घटना घडली. बस्टाविरुध्द सर्विस गमावल्याच्या निराशेत जोकोवीचने मागे न बघताच सहजपणे आपल्या रॕकेटने तो चेंडू फटकावला होता. दुर्देवाने तो पाठीमागे उभ्या लाईन जज महिलेला गळ्यावर लागला.

यामुळे जगातील या नंबर वन खेळाडूची चौथ्या युएस ओपन विजेतेपदाकडे सुरु असलेली वाटचाल अनपेक्षितरित्या संपली. यंदा सलग 30 सामने जिंकून आणि फेडरर-नदाल-वावरिंका यांच्या अनुपस्थितीत आणि अँडी मरेच्या पराभवानंतर तोच विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. परंतु अपघाताने घडलेल्या या घटनेने त्याचे 18 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद तर हुकलेच शिवाय अपात्र ठरल्याने त्याला युएस ओपनची बक्षीस रक्कम आणि चौथी फेरी गाठेपर्यंतच्या गुणांनाही मुकावे लागणार आहे. एवढेच नाही तर त्याला दंडसुध्दा होऊ शकतो.

ही घटना केवळ अपघाताने घडली आहे. आपला त्यामागे कोणताही हेतू नव्हता हे त्याने पंचांना समजावण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. स्पर्धेच्या अधिकाऱ्यांनी प्रदीर्घ चर्चेनंतर त्याला अपात्र ठरवले.

स्पर्धा आयोजक यु.एस.टेनिस असोसिएशनने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या नियमानुसार मैदानावर असताना परिणामांचा विचार न करता चेंडू धोकादायकरित्या व बेपर्वाईने मारण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे युएस ओपन स्पर्धेच्या रेफरींनी नोव्हाक जोकोवीचला 2020 च्या स्पर्धेसाठी अपात्र ठरवले आहे.

या घटनेबद्दल जोकोवीचचा प्रतिस्पर्धी पाब्लो कॅरेनो बस्टा म्हणाला की, अशा गोष्टी कुणीही जाणिवपूर्वक करत नाही. हे तर केवळ जोकोवीचचे दुर्देव म्हणता येईल. अशा गोष्टी बघायला कुणालाच आवडणार नाही पण पंचांना मारावे असा प्रयत्न जोकोवीचचा निश्चितच नसेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER