
- जावेद अख्तर यांची बदनामीची फिर्याद
मुंबई: गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी खटल्यातील आरोपी म्हणून येत्या १ मार्च रोजी कोर्टात हजर राहण्याची नोटीस बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिला सोमवारी जारी करण्यात आली.
‘रिपब्लिक टीव्ही’चे प्रधान संपादक अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत बदनामीकारक विधाने केल्याबद्दल जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध खासगी फौजदारी फिर्याद दाखल केली होती. अंधरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्या अनुषंगाने तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश याआधी दिला होता. अख्तर यांच्या फिर्यादीत सकृद्दर्शनी तथ्य दिसते, असा अहवाल पोलिसांनी सादर केल्यानंतर महानदर दंडाधिकारी आर. आर. खान याांनी कंगनाला नोटीस काढली. जबाब नोंदविण्यासाठी आम्ही कंगनाला समन्स पाठविले होते. परंतु ती आली नाही, असेही पोलिसांनी अहवालात नमूद केले होते.
जावेद अख्तर हे बॉलिवूडच्या ‘स्युईसाईड गँग’चे सदस्य आहेत व काहीही केले तरी सहीसलामत सुटू शकतात, अशा आशयाचे विधान कंगनाने त्या मुलाखतीत केल्यावरून अख्तर यांनी हा बदनामी खटला दाखल केला आहे.
अख्तर यांचे वकील अॅड. जयकुमार भारव्दाज यांनी दंडाधिकाºयांना सांगितले की, कंगनाने हे विधान ती आणि अख्तर यांच्यात झालेल्या कथित संभाषणाच्या हवाल्याने केले होते. हे कथित संभाषण झाले तेव्हा दोघांच्याही परिचयाचे जे इतर लोक तेथे हजर होते असे कंगनाने म्हटले होते त्यात एका डॉक्टरांचा समावेश होता. परंतु या डॉक्टरने पोलिसांना दिलेल्या जबानीत असे कोणतेही संभाषण झाले नसल्याचे सांगितले आहे.
कंगनाच्या त्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप न्यायालयात सादर करून अॅड. भारद्वाज म्हणाले की, ही मुलाखत यूट्यूबवरही प्रसारित करण्यात आल्याने माझ्या अशिलांची सर्वदूर बदनामी झाली आहे.
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला