शिवसेनेत प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांना नोटिसा

NCP-Shivsena

मुंबई :- शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातून विस्तवही जात नाही. राज्यपातळीवर दोन्ही पक्ष गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र, बीडमध्ये दोन्ही पक्षांचे अजिबात पटत नसल्याचे दिसतेय. संदीप क्षीरसागर समर्थक नगरपालिकेतील काकू-नाना विकास आघाडीच्या पाच नगरसेवकांनी पक्षांतर करत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी याचिका पालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी केली आहे. याचिकेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी पाचही नगरसेवकांना नोटीस काढली आहे. यावर आज सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडील नगरसेवक प्रभाकर पोपळे, रंजित बन्सोडे, सीता मोरे, कांताबाई तांदळे आणि अश्विनी गुंजाळ या पाच नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देत पुतणे आमदार संदीप यांना चांगलाच हादरा दिला होता.

यानंतर आता काकू-नाना विकास आघाडीचे सचिव तथा बीड नगरपालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी जगताप यांच्याकडे शिवसेनेत प्रवेश केलेल्या त्या पाच नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना जिल्हाधिकारी जगताप यांनी पाच नगरसेवकांना नोटिसा पाठवल्या असून येत्या २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणी हाेणार आहे.

ही बातमी पण वाचा : TOPS SECURITY प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा नाहीच?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER