वेळ मागणाऱ्या वकिलास नाव बदलण्याची सूचना !

नवी दिल्ली : दाखल केलेले प्रकरण न्यायालयात क्रमानुसार सुनावणीस आल्यावर युक्तिवाद करण्याऐवजी पुढची तारीख मागणाऱ्या एका वकिलाची विनंती मान्य करताना वकिलांच्या (lawyer) या प्रवृत्तीवर खरपूस ताशेरे ओढले आणि त्या संबंधित वकिलास स्वत:चे नाव बदलून घेण्याची मिस्कील सूचनाही केली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील अक्षयकुमार सिंग (Akshay Kumar Singh) नावाच्या एका शिपायाने दाखल केलेले एक प्रकरण अलीकडेच न्या. राजीव सहाय एन्डलॉ व न्या. आशा मेनन यांच्या खंडपीठापुढे ‘व्हच्युअल’ सुनावणीसाठी आले.

हे प्रकरण पवनकुमार रे नावाच्या वकिलाने दाखल केले होते. पण सुनावणीस स्वत: हजर न राहता त्यांनी रित अरोरा नावाच्या आपल्या सहाकाऱ्यास पाठविले होते. असे का? या न्यायालयाच्या प्रश्नास अरोरा यांनी उत्तर दिले की, त्यांनी रे यांना फोन केला; पण त्यांनी तो उचलला नाही.आपल्याला स्वत:ला या प्रकरणाची काहीच माहिती नाही, असे सांगून रे यांच्याऐवजी स्वत: युक्तिवाद करण्यास अरोरा यांनी असमर्थता व्यक्त केली.

मात्र त्यांनी न्यायालयास अशी विनंती केली की, याच घटनेच्या संदर्भात ‘सीआयएसएफ’मधील आणखी एका शिपायाने दाखल केलेले प्रकरण दोन दिवसांनी याच न्यायालयापुढे सुनावणीस यायचे आहे. त्यामुळं आमचे प्रकरणही त्याच्यासोबतच घ्या.अखेरीस खंडपीठाने अरोरा यांची विनंती मान्य केली. परंतु तसे करत असतानाच वकिलांच्या या प्रवृत्तीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत खंडपीठाने म्हटले की, सुनावणीसाठी येणाऱ्या प्रकरणांची जाडजूड बाडं वाचून, समजावून घेण्यासाठी आम्ही न्यायाधीश मंडळी खूप वेळ व कष्ट घेतो.

सुनावणी पुढे ढकलण्याच्या वकिलांच्या सर्वस्वी असमर्थनीय वागण्यामुळे ते सर्व वाया जाते. यापुढे असे न वागण्याची ताकीदही न्यायालयाने सर्व वकिलांना दिली. एवढे करून न थांबता अरोरा यांना मिस्कील सूचना करताना खंडपीठाने म्हटले की, अरोरा यांनी आपल्या इंग्रजीतील नावाच्या सुरुवातीला ‘डब्ल्यू’ हे आणखी एक अक्षर लावून नाव बदलून घ्यावे. (Rit Writ) (यातून ध्वनित होणारा अर्थ प्रत्यक्ष युक्तिवाद न करता न्यायालयात नुसती बाडं घेऊन फिरणारा वकील!)

सोय ज्येष्ठांची, बोलणी कनिष्ठांना
बहुतेक न्यायालयात नेहमीच असे प्रकार घडत असतात. एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकरणे सुनावणीस येणार असली की ज्येष्ठ वकील अशा प्रकारे कनिष्ठांना अशी विनंती करण्यासाठी पिटाळतात. न्यायाधीशांचा रोष या कनिष्ठांना सोसावा लागतो. ज्येष्ठांना अशा प्रकारे खडसावल्याचे कधी दिसत नाही. काही खमके न्यायाधीश मात्र वेळ मागणाऱ्या कनिष्ठ वकिलासच युक्तिवाद सुरू करायला सांगतात. त्याची तयारी नसली तर ‘पुढच्या तारखेला तयारी करू ये. आम्ही फक्त तुझाच युक्तिवाद ऐकू’ असे सांगून प्रोत्साहन देतात. असे टक्केटोणपे खाऊनच कनिष्ठ वकील ‘तयार’ होतात. आजच्या अनेक नामवंत वकिलांच्या यशस्वी करिअरची सुरुवातही अशाच प्रसंगांतून झाल्याची उदाहरणे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER