राजीव गांधी यांच्या खुन्याच्या याचिकेवर हायकोटाची नोटीस

Mumbai hc - sanjay dutt-A. G. Perarivalan
  • संजय दत्तच्या मुदतपूर्व सुटकेची हवी माहिती

मुंबई : सन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा अंशत: कमी करून त्याला कशाच्या आधारावर तुरुंगातून मुदतीआधी सोडण्यात आले याची माहिती मिळविण्यासाठी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल जन्मठेप भोगत असलेल्या ए. जी. पेरालीवलन या सिद्धदोष कैद्याने केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे.

राजीव गांधी हत्या खटल्यात पेरारीवलन यास फाशीची शिक्षा झाली होती. परंतु त्या फाशीची अंमलबजावणी ११ वर्षे केली न गेल्याने सर्वोच्च न्यायाललयाने त्यास फाशी रद्द करून जन्मठेप दिली. पेरारीवलन गेली ३१ वर्षे तमिळनाडूत तुरुंगात आहे. संजय दत्तची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका का व कशी झाली याची माहिती सन २०१६ मध्ये येरवडा मध्यवर्ती  कारागृहाकडे माहिती अधिकार कायद्यान्वये मागितली होती. त्यांनी व नंतर राज्य माहिती आयोगानेही ती माहिती न दिल्याने पेरारीवलन याने उच्च न्यायालयात याचिका केली.

न्या. के. के. तातेड व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे ही याचिका आली असता पेरारीवलन याचे वकील अ‍ॅड. निलेश उके यांचे म्हणणे थोडक्यात ऐकल्यानंतर न्यायालयाने येरवडा कारागृह, राज्य सरकार व राज्य माहिती आयोग या प्रतिवादींना नोटीस जारी केली.

संजय दत्तला बॉम्बस्फोट खटल्यात विशेष ‘टाडा’ न्यायालयाने सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. सर्वोच्च न्यायालयाने अपिलात ती कमी करून पाच वर्षांची केली. त्या कमी केलेल्या शिक्षेतही २५६ दिवसांची सूट देऊन संजय दत्तला २५ फेब्रुवारी, २०१६ रोजी तुरुंगातून सोडण्यात आले होते.

पेरारीवलन यानेही त्याची फाशी रद्द होऊन त्याऐवजी जन्मठेप झाल्यावर त्याची शिल्लक शिक्षा  माफ करून सुटका व्हावी यासाठी तमिळनाडूच्या राज्यपालांकडे अर्ज केला. त्यावर दोन वर्षे काहीच निर्णय न झाल्यावर पेरारीवलन सर्वोच्च न्यायालयात गेला. तेथे केंद्र सरकारने अशी भूमिका घेतली की, पेरारीलन यास ‘टाडा’ कायद्यान्वये शिक्षा झाली आहे. ‘टाडा’ हा केंद्र सरकारने केलेला कायदा असल्याने शिक्षेत सूट वा माफी देण्याचा अधिकार राज्यपालांना नव्हे तर फक्त राष्ट्रपतींनाच आहे.

केंद्र सरकारने ही भूमिका घेतल्यावर पेरारीवलन यांने संजय दत्तच्या शिक्षा माफीची माहिती घेण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. संजय दत्तलाही ‘टाडा’खालीच शिक्षा झाली होती. मग त्याची शिक्षा राज्य सरकाररने कशी कमी केली, याचे उत्तर त्याला हवे आहे. ही  माहिती  मिळाली की आपल्या शिक्षा माफीसाठीही त्याचा उपयोग होईल, असे त्याचे म्हणणे आहे.
मात्र संजय दत्तला दिली गेलेली शिक्षामाफी बरोबर होती की चूक यात आपल्याला काही स्वारस्य नाही तसेच चूक असेल तर ती रद्द करून त्याला राहिलेली शिक्षा भोगण्यासाठी  पुन्हा तुरुंगात धाडावे, असेही आपले म्हणणे नाही, असे पेरारीवलन याने याचिकेत स्पष्ट केले आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER