‘मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने काही साध्य होणार नाही, सर्व कारभार फडणवीसांच्या हातात द्यावा’

Nitesh Rane - CM Uddhav Thackeray - Devendra Fadnavis

मुंबई :- तौक्ते चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) सर्वांत जास्त फटका कोकणाला बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कालपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोकणच्या दौऱ्यावर असून, झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. तर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हेही नुकसानग्रस्त सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नसल्याचे म्हटले आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तोंड पाण्याने धुतल्यावर सगळं निघून जाते. देवेंद्र फडणवीस यांचा दौरा कोकणातील खरी वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही, असे नितेश राणे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्व कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवावा. मग आम्ही किती मदत आणून दाखवतो, ते दिसून येईल. नुसता केसांचा टोप घालून कुणी हिरो होत नाही. सरकारमध्ये वजन लागते. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, मदत आणून दाखवा, असे म्हणत नितेश राणे यांनी उदय सावंत यांना चिमटा काढला. मागच्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गाचे मोठे नुकसान झाले. मात्र आद्यपही मदत मिळाली नाही. मागच्या अनुभवावरून महाविकास आघाडी सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार? जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काल माहिती मिळाली. ८ कोटींपैकी फक्त ४९ लाख रुपयांचा निधी आतापर्यंत मिळाला आहे. आज मुख्यमंत्री पंचनामे करण्याचे आदेश देतात मग ते पंचनामे रद्दी भरण्यासाठी ठेवले जातात. अधिकारी पर्यटनासाठी गावागावांत फिरतात का? मुख्यमंत्री उद्या कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आम्हाला जास्त अपेक्षा नाहीत. मागच्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे आजही मिळाले नाहीत तर आता काय देणार? उद्याचा त्यांचा दौरा फोटोसेशनसाठी आहे. फोटोग्राफरने फोटो काढायचे असतात, स्वतःचे फोटो काढून घ्यायचे नसतात… जर ते फोटो काढून घेण्यासाठी येत असतील ते काम त्यांनी घरी बसूनच करावे… इथे येण्याची गरज काय ? इथे येतच असाल तर राज्याच्या जनतेच्या दिलाशासाठी पॅकेज जाहीर करतात… निसर्ग चक्रीवादळाची, तौक्ते चक्रीवादळाची नुकसान भरपाई द्या. आमचं केंद्रात सरकार आहे. आम्ही सर्व माहिती सरकारला दिली आहे. आमचे मुख्यमंत्री कमी पडले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भरपूर मदत मिळणार आहे, असा दावाही नितेश राणे यांनी केला.

ही बातमी पण वाचा : वॉचमनची लायकी नाही त्याला आमदार केला, त्रास भोगावाच लागेल; राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button