… मराठीसाठी काहीच नाही! मेल्यावर साहेबांना काय सांगू? रावतेंचा संताप

Diwakar Raote

मुंबई : विधिमंडळाच्या सभागृहाच्या कामकाजात इंग्रजी शब्दांच्या होणाऱ्या वापरामुळे शिवसेनेचे (Shiv Sena) ज्येष्ठ नेते, आमदार दिवाकर रावते (Diwakar Raote) संतापले. मराठीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना हे होते आहे, याबद्दल त्रागा केला. म्हणालेत, मेल्यावर साहेबांना भेटलो आणि वर गेल्यावर मला त्यांनी विचारले की मराठी भाषेसाठी काय केले तर मी काय उत्तर देऊ?

सभागृहात कामकाज सुरू असताना इंग्रजी शब्दांच्या वापराला दिवाकर रावते यांनी विरोध केला. मराठी भाषा आणि मराठी विद्यापीठ मुद्द्यावर सरकारला धारेवर धरत स्वपक्ष शिवसेनेलाही घरचा आहेर दिला.

दिवाकर रावते म्हणाले, सभागृहात कामकाज सुरू असताना इंग्रजी शब्दांचा वापर चुकीचा आहे. मराठी शब्द संग्रह असताना इंग्रजीचा वापर करणे हास्यास्पद आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देखील अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल एक शब्दही आला नाही. याबद्दल मी खंत व्यक्त करतो.

शिवसेनेला मराठीबाबत एक शब्द उच्चरता आला नाही!

मराठी राजभाषा असून त्याचा वापर प्रशासकीय कामकाजात वापरायला हवा. मुंबईतील बॉम्बे क्लबचे नाव आजही तेच आहे, बदलले जात नाही. मुंबईत सर्व भाषा आणि परप्रांतीयांचे भवन आहेत, मराठीचे का नाही? शिवसेनेला मराठीबाबत एक शब्द उच्चरता आला नाही हे दुर्दैव आहे. अशी खंत रावते यांनी व्यक्त केली.

कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये नाही म्हणून संभाजीनगर म्हणायचे नाही!

संभाजीनगर म्हणायचे नाही, कारण हे कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये नाही! असे म्हटल्यानंतर शांत बसायचे? मराठी विद्यापीठाबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही. याबाबत मला बोलावं लागत आहे हे वाईट आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा, मात्र अर्थसंकल्पात मराठीसाठी काहीच नाही. मी मेल्यावर साहेबांना भेटलो आणि वर गेल्यावर मला त्यांनी विचारलं की मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ?” असा सवाल दिवाकर रावते यांनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER