पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर्स न वापरणे म्हणजे घृणास्पद राजकारण – प्रवीण दरेकर

Pravin Darekar

मुंबई : राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या (Corona) संकटात कोविड लस, व्हेंटिलेटर्स (Ventilators), ऑक्सिजन (Oxygen), रेमडेसिवीरवरुन (Remdesivir) राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी पीएम केअर फंडातील (PM Care Fund) व्हेंटिलेटर्सवरुन राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर्स वापरलेच नसल्याचा दावा प्रविण दरेकर यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारकडून घृणास्पद राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रविण दरेकर म्हणाले, कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता राज्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबईच नाही तर ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे नातेवाईक वणवण भटकत आहेत. त्यातच राज्य सरकारकडून केंद्रावर सातत्याने टीका होत आहे की, केंद्र सराकर महाराष्ट्राला झुकतं माप देत आहे. मात्र, संकट काळात मदत म्हणून केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून दिलेले ४०० व्हेंटिलेटर्स हे वापरलेच नसल्याचा आरोप त्यांनी केला.

पीएम केअर फंडातून आलेले ४०० व्हेंटिलेटर्स वापरात न आणणे हे राज्याला शोभत नाही. व्हेंटिलेटर्स खराब असल्याने ते वापरत नसल्याचं राज्य सरकार म्हणत आहे. काही व्हेंटिलेटर्स खराब असू शकतील पण त्यासाठी ४०० व्हेंटिलेटर्स न वापरणं याला काहीही अर्थ नाही. केवळ पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर्स आले त्यामुळे ते वापरले नाहीत अशी शंका उपस्थित होत आहे. जर असे असेल तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हे घृणास्पद राजकारण करू नये अशी विनंतीही प्रविण दरेकर यांनी केली आहे.

दरम्यान, आपण भाजप खासदार असताना आपला फोन टॅप झाल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रविण दरेकर म्हणाले, कुणाचेही फोन टॅप करणे योग्य नाही. नाना पटोले यांचे फोन टॅप होत असतील तर या संदर्भातील माहिती द्यावी. जर असे काही घडले असेल तर सर्व प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button