मोराचा नव्हे गं राणी… ट्रकच्या हॉर्नचा आवाज

not-the-peacock-but-the-queen-the-sound-of-a-truck-horn

मालिकेच्या शूटिंगवेळी ऑफस्क्रीन घडणारे अनेक किस्से कलाकार नेहमीच सांगतात. कधी प्रत्यक्ष सीन सुरू असताना काहीतरी धमाल होते आणि सेटवर हशा पिकतो तर शूटिंगच्या निमित्ताने आउटडोअर असताना मजेशीर प्रसंग घडतो आणि तो किस्सा कायम लक्षात राहतो. असाच किस्सा घडलाय राजा राणीची गं जोडी या मालिकेच्या टायटल साँगच्या चित्रीकरणावेळी आणि आजही हा किस्सा आठवून मालिकेची नायिका संजीवनी अर्थात शिवानी सोनार लाजेने चूर होते. शिवानीची खेचायची असेल तर मालिकेतील तिचा नायक रणजित म्हणजे मणिराज पवार तिची चांगलीच शाळा घेतो.

वर्षभरातच लोकप्रियता मिळवलेल्या राजा राणीची गं जोडी या मालिकेतील संजीवनी आणि रणजित यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडतेय. खरंतर मणिराज आणि शिवानी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. मणिराजची तर ही पहिलीच मालिका आहे. शिवानीने यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबडेकर मालिकेत लक्ष्मीबाई ही भूमिका साकारली असली तरी मुख्य नायिका म्हणून शिवानीचाही पहिलाच अनुभव आहे. मालिकेतील जोडी प्रेक्षकांना तेव्हाच आवडते जेव्हा त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते. शिवानी आणि मणिराज यांनी ही लढाई आपल्या अभिनयाने आणि एकमेकांसोबतच्या गिव्ह अँड टेकमधून जिंकली आहेच.

या मालिकेच्या सुरूवातीपासूनच शिवानी आणि मणिराज यांच्या खूप आठवणी आहेत. मालिकेच्या शूटिंगसाठी टीम सध्या सांगलीत मुक्कामाला आहे. त्यामुळे मालिकेचे आऊटडोअर सीन शूट करायचे असतील तर सांगली, सातारा या परिसरातील लोकेशन्सची निवड केली जाते. या मालिकेच्या शीर्षकगीताचे खास रोमँटिक स्टाइलमध्ये शूट झाले आहे. शिवानी आणि मणिराज यांच्यावर चित्रीत झालेले हे गाणे कास पठारावर शूट करण्यात आले आहे. याच गाण्याच्या शूटिंगवेळी एक किस्सा घडला होता. एकतर थंडीच्या दिवसात या गाण्याच्या शूटिंगचे शेड्यूल लावले होते. कासपठारावरची थंडी म्हणजे काही विचारू नका. हा किस्सा शिवानी आणि आणि मणिराजने एका खास मुलाखतीत सांगितला.

या गाण्यासाठी शिवानीला शिफॉनची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउज असा लूक दिला होता आणि मणिराज मात्र शर्ट पँट आणि जॅकेट अशा ड्रेसमध्ये होता. शिवानीला मणिराजपेक्षा जास्त थंडी वाजत होती. प्रचंड वारं आणि थंडी अशा वातावरणात गाण्याचे एकेक शॉट ओके होत होते. या गाण्यात एक ड्रोन शॉट आहे आणि त्यावेळी शिवानी व मणिराज रस्त्याकडेच्या मोकळ्या पठारावर सीन देत होते. सीन झाल्यानंतर शिवानीला एक आवाज ऐकू आला आणि तिला खूप आनंद झाला. कास पठारासारखी निसर्गरम्य जागा, आजूबाजूला झाडे, फुले, पक्ष्यांचे आवाज यामुळे शिवानीला कधी एकदा शूट संपतेय आणि तिला या भागात फिरायला मिळतेय असं झालं होतं. तेवढ्यात तिला मोराचा आवाज ऐकू आला आणि उत्साहाच्या भरात ती मणिराजला म्हणाली, ते बघ, मोराचा आवाज ऐकू येतोय…चल की आपण जाऊया बघायला. मणिराजलाही क्षणभर मोराचा आवाज असल्यासारखे वाटले पण नीट ऐकल्यानंतर त्याने काय ओळखायचे ते ओळखले आणि जोरात हसायला लागला. या मालिकेत ऑनस्क्रीन मणिराज शिवानीला राणीसरकार अशी हाक मारत असतो. त्याच टोनमध्ये मणिराज शिवानीला म्हणाला की अगं हा मोराचा आवाज नाही राणी… रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकच्या हॉर्नचा आवाज आहे. वाऱ्यामुळे तो हॉर्न मोराच्या आवाजासारखा येतोय असं म्हणत त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रककडे बोट दाखवलं. मग काय, समोर युनिटमधले काही लोक होतेच हे ऐकायला.

त्यांनाही हसू आवरेना. सुरूवातीला शिवानीला राग आला पण नंतर मोराच्या प्रेमात आपण ट्रकच्या हॉर्नला मोराचा आवाज म्हटल्याने कसा विनोद झाला यावरून शिवानीलाही हसू आवरेना. गाण्याच्या शूटिंगसाठी जवळपास सात ते आठ तास प्रत्येकजण काम करत होता. सगळ्यांनाच कंटाळा आला होता, पण शिवानीच्या या मोर आणि ट्रकच्या गोंधळाने वातावरण हलकंफुलकं केलं आणि सगळे हसत हसतच सेटवर परतले. आजही सेटवर मरगळ आली असेल तर मणिराज शिवानीची मोराच्या आवाजावरून थट्टा करतो आणि सगळे मनसोक्त हसतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER