स्टेपनी नाही; आमच्या सत्तेचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनीच अजित पवारांकडे सोपवले स्टेअरिंग

बारामती : अनेक वर्षांनंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांच्या बारामतीत गेले आहेत. मागिल दोन दिवसांपासून बारामतीकर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी करत होते. मुख्यमंत्रिपदाची धुरा हातात घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बारामतीत गे आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच सारथ्य अजित पवारांकडे आले.

राज्यकारभार सांभाळताना मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री सरकारचे मुखीया असतात. या दोन पदांमध्ये तुलना अशक्य आहे. हेच आजचे चित्र सांगत आहे. मात्र, काल शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सरकारची स्टेपनी असे संबोधले होते. आज दुस-याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मात्र अजितदादांकडे थेट स्टिअरिंग व्हील दिलं आहे. आमच्या सत्तेचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे आहे, असा खुशखुशीत डायलॉगसुद्धा उद्धव ठाकरेंनी मारला.

बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेता आमिर खान, कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख या सोहळ्याला उपस्थित होते.

कृषी विज्ञान केंद्राचं कार्यालय पाहून झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अजित पवार ड्रायव्हिंगला बसलेल्या कारमध्ये बसले. त्यानंतर फोटोसेशन झालं. तेव्हा, आमच्या सरकारचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे आहे, असं उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.

‘कृषिक’ हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रदर्शन आहे. जगभरातील नवनवे तंत्रज्ञान येथील शेतीच्या प्रात्यक्षिकांमधून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जाते. या प्रात्यक्षिकांची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे या प्रदर्शनात करणार आहेत. हे प्रदर्शन 19 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.

अजित पवार स्टेपनी, तर सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे योग्य व्यक्ती – संजय राऊत