आजी-आजोबांना नातवंडांना भेटण्यापासून रोखणे अयोग्य! : उच्च न्यायालय

not-right-to-deprive-childs-access-to-grandparents-says-bombay-high-court

मुंबई : लग्नानंतर सासू-सासऱ्यांनी खूप वाईट वागणूक दिल्याच्या कारणास्तव मुलांना त्यांच्या आजी-आजोबांना भेटण्यापासून रोखणे योग्य नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने नुकताच दिला. तसेच १० वर्षांच्या मुलाला त्याच्या आजी-आजोबांना आठवडय़ातून एकदा भेटू देण्याचे आदेश न्यायालयाने मुंबईस्थित सुनेला दिले.

पतीच्या मृत्युनंतर याचिकाकर्त्यां महिलेने मुलाला सासू-सासऱ्यांना भेटू दिले नव्हते. परंतु सासू-सासऱ्यांना आठवडय़ातून एकदा वा ते दिल्लीहून जेव्हा मुंबईला येतील त्यावेळी त्यांना त्यांच्या नातवाला भेटू द्यावे, असे आदेश कुटुंब न्यायालयाने दिले होते. त्या विरोधात या सुनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र कुटुंब न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत सुनेने कुटुंब न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेले अपील न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला यांच्या खंडपीठाने फेटाळले.