मोदीच काय डोनाल्ड ट्रम्प जरी आले तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही : धनंजय मुंडे

Dhananjay Munde

बीड : परळी मतदारसंघात ‘काटे की टक्कर’ असलेल्या मुंडे बंधू-भगिनीमधील लक्ष वेधी लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. यात निवडणूक प्रचारात एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना एकही संधी सोडत नाहीत. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे म्हणाले, परळी मतदार संघात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जरी आणले तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही. परळी मतदार संघातील घाटनांदूर येथील प्रचार सभेला धनंजय मुंडे यांनी संबोधित केले.

ही बातमी पण वाचा : परळीत मुंडे बहीण-भावात घनघोर संघर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व बालकल्याण मंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी 17 ऑक्टोबरला परळीत जाहीर सभा होणार आहे. यावर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले की, भाजप पराभवाच्या भीतीने मोठ-मोठे नेते आणत आहे. पण भारतातील नेत्यांबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी परळीत सभेला आले तरी माझाच विजय निश्चित आहे, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जी रॅली पहिली त्याचा धसका घेतला म्हणून बड्या नेत्यांना परळी मतदार संघात प्रचारासाठी आणण्यात येत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या माळी-धनगर-वंजारी या ‘माधव; समीकरणातील सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे लोकसभा निवडणुकीपासून नाराज होते. शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का समजला जात आहे. भाजपसोबत एकनिष्ठ काम करून सत्तेचा वाटा दिला नाही, वारंवार डावलले. यामुळे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वावर नाराज होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात ओबीसी मतांचा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

ही बातमी पण वाचा : मोदींनी चीनच्या राष्ट्रपतीला विचारले नाही, डोकलाममध्ये चीनचे सैन्य कसे आले : राहुल गांधी

बीड जिल्ह्यात वंजारी, धनगर या समाजानंतर माळी समाजाची मोठी मते आहेत. काही दिवसापूर्वी आखाडे यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली होती. याच भेटीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार सावता परिषद भाजपसोबत काडीमोड करून शरद पवार यांच्या उपस्थितीत गेवराईमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यात सावता परिषदेची मोठी ताकद आहे.

माळी समाजाचे एवढे मोठे संघटन असतानाही सत्ताधार्‍यांनीआमची उपेक्षा केली. आपला विचार होताना दिसला नाही. माळी समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार हे आश्वासक वाटल्याने आपण हा प्रवेश केल्याचे कल्याणराव आखाडे यांनी सांगितले आहे.