राष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही, हे सरकार आपोआपच कोसळेल : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई :- देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. अडीच-तीन हजारांनी कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. यावर राज्यपालांकडे केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी हे भाजपाचे नाही तर आपले वैयक्तिक मत असल्याचा खुलासा खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

त्यामुळे नारायण राणे पक्षात या मागणीवरून एकाकी पडले आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राणे यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी किंवा राज्यात सरकार स्थापन करण्याची आमची कोणतीही इच्छा नाही. आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन कोरोना विरुद्धची लढाई लढायची आहे. अशा वेळी राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण व्हावी वा कोणतेही राजकीय संकट उभे राहावे, असे आम्हाला अजिबात वाटत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. हे सरकार कसेबसे चालले आहे. त्यामुळे हे सरकार कुणी पाडण्याची गरज नसून ते आपोआपच कोसळणार आहे, असेही फडणवीस म्हणाले. कोरोनाच्या स्थितीवरून फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार शब्दांत निशाणा साधला. तसेच पीपीई किटवरूनही फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य केले. राज्यातील कोरोना साथीची स्थिती चिंताजनक आहे. देशातील ३६ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र सरकारने नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली नसल्यानेच ही स्थिती निर्माण झाली असल्याचे फडणवीस म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER