फडणवीस नव्हे तर महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ – प्रवीण दरेकर

Pravin Darekar

नाशिक :- आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अहवालाच्या आरोपावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बुमरँग झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. सत्ताधाऱ्यांचा हा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी फेटाळला. फडणवीस नव्हे तर आघाडी सरकामधील नेतेच अस्वस्थ झाल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला.

नाशिक (Nashik) येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्याची पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर आज शेतकऱ्यांच्या बांधावर आले होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस अस्वस्थ होण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही. फडणवीसांनी सरकारवर केलेला घणाघात, त्यांनी सरकारचे काढलेले गैरव्यवहार आणि घोटाळे बाहेर काढल्याने सरकाच अस्वस्थ झालं आहे. त्यामुळेच फडणवीस अस्वस्थ झाल्याचा कांगावा केला जात आहे, असं दरेकर यांनी सांगितलं.

आज महाराष्ट्रातील जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही हे दाखवून देण्याचं काम फडणवीस करत आहेत. त्यामुळे त्यांना अस्वस्थ होण्याचा प्रश्न येतोच कुठे? उलट नवाब मलिक यांच्यासह सर्व नेते अस्वस्थ झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस हे मलिक किंवा सरकार यांचे नाही. महाराष्ट्र पोलीस सर्वांचेच आहे. पोलिसांची बदनामी होऊ नये हे असे आमचेही मत आहे. परंतु पोलीस खात्यात काही बदनाम लोक आहेत. त्यांना संरक्षण दिलं जात आहे. पोलीस दलात वाझे सारख्यांना प्रमोशन दिलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालाची दोन पानेच फडणवीसांनी उघड केली होती. पण हा संपूर्ण अहवाल मलिक यांनी जाहीर केला. एका दिवसात हा गुप्त अहवाल उघड झालाच कसा? माध्यमांच्या हाती हा अहवाल लागलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करतानाच दुसऱ्यांकडे दोन बोटं दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात याचं भान सरकारला नाही हे दुर्देव आहे, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यावरही टीका केली. ते कधी स्वबळाची भाषा करतात तर कधी एकमेकांचा बचाव करतात. त्यांनाच त्यांचं कळत नाही. भाजपची भीती वाटते म्हणून हे दोन्ही पक्ष एकमेकांना एकमेकांचे गोडवे गातात. शिवसेना आणि काँग्रेसचं काही खरं नाही. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. सत्तेसाठी त्यांनी विचारधारा गुंडाळून ठेवली आहे. पक्ष टिकवण्यासाठीच ते स्वबळाची भाषा करत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

ही बातमी पण वाचा : ‘महाविकास आघाडी फसवे सरकार’; हर्षवर्धन पाटलांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER